कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना देखील नाश्ता आणि जेवण मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:05 IST2025-05-17T18:04:19+5:302025-05-17T18:05:39+5:30
कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार : ग्रामीण रुग्णांची हेळसांड

Women who came to Kondhali Primary Health Center for delivery were also not given breakfast and food.
ब्रिजेश तिवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी : प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना चहा, नाश्ता, जेवण सरकारच्यावतीने मोफत दिले जाते. मात्र, कोंढाळी (ता. काटोल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या महिलांना या सुविधा पुरविल्या जात नसल्याचे उघड झाले आहे. एका महिलेने आपल्याला दोन दिवस जेवण मिळाले नाही, अशी लेखी तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
रेवती उमेश धर्मे, रा. पांजरा (काटे), ता. काटोल या प्रसूतीसाठी बुधवारी (दि. १४) कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती झाल्या. त्याच दिवशी रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान त्यांची प्रसूती झाली. आपल्याला दोन दिवसांपासून भरती असतानाही चहा, नाश्ता, जेवण मिळाले नाही, अशी लेखी तक्रार त्यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी येणाऱ्या बहुतांश महिलांसोबत घडतो. मात्र, त्या महिला याकडे दुर्लक्ष करीत या प्रकराची कुणाकडेही तक्रार करीत नाही किंवा याची वाच्यता करीत नाहीत. त्यामुळे आजवर हा प्रकार अधिकृतरीत्या उघड झाला नाही. याचा फायदा आरोग्य केंद्रातील अधिकारी व आहार पुरवठा कंत्राटदार घेतो. रेवती धर्मे यांनी हिंमत करीत लेखी तक्रार करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला आहे. या प्रकाराची निरपेक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी या तक्रारीत केली आहे.
जेवण न देता रकमेची उचल ?
प्रसूती महिलांना देण्यात येणाऱ्या या सुविधांसाठी आहार पुरवठा कंत्राटदाराला सरकारकडून पैसे दिले जातात. कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १० ते १५ किमी परिसरातील दुर्गम गावांमधील महिला प्रसूतीसाठी येतात. रेवती धर्मे यांच्याप्रमाणे अनेक महिलांना उपाशी राहण्याची किंवा घरून जेवण मागविण्याची वेळ आली आहे. मात्र, त्यांच्या चहा, नाश्ता, जेवणाची कागदोपत्री नोंद करून बिले मंजूर व रकमेची उचल केली जाण्याची तसेच यात घोळ केल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फलक मात्र अद्ययावत
या आरोग्यात प्रसूती महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा मोठा फलक लावला आहे. सकाळी ७वाजता १५० मिलि चहा, सकाळी ८:३० वाजता एक प्लेट नाश्ता (पोहे, उपमा, सोजी, ब्रेड त्यापैकी एक), दुपारी १२ वाजता जेवण (वरण, भात, भाजी, पोळी), सायंकाळी ४ वाजता चहा, ब्रेड, सोजी, रात्री ८ वाजता जेवण (वरण, भात, भाजी, पोळी, उसळ) दिले जात असल्याचे या फलकावर ठळक अक्षरांमध्ये नमूद आहे.