उद्यापासून लागणार गुलाबी थंडीची चाहुल; विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातही थंडीला सुरवात होण्याची शक्यता
By निशांत वानखेडे | Updated: November 6, 2025 20:23 IST2025-11-06T20:22:38+5:302025-11-06T20:23:57+5:30
पारा घटला, पण सरासरीच्या वर : आठवडाभरात वाढेल थरथर

Winter spell to begin from tomorrow; Cold wave likely to start in entire Maharashtra including Vidarbha
नागपूर : नाेव्हेंबरचा पहिला आठवडा संपत असताना अद्याप थंडीचा प्रभाव जाणवला नाही. मात्र रात्रीचा पारा आता घसरायला लागला आहे. येत्या दाेन दिवसात म्हणजे ८ नाेव्हेंबरपासून कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंशाची घसरण हाेईल व गुलाबी थंडी जाणवायला लागेल, असे निरीक्षण हवामान विभागाने नाेंदविले आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातही थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते.
सध्या उत्तर भारतात बळकट पश्चिमी झंजावातातून हंगामाला साजेशी बर्फवृष्टी होत आहे. मंगळवारच्या हलक्या सरीनंतर दाेन दिवसांपासून विदर्भाचे आकाश निरभ्र झाले आहे. दाेन दिवसानंतर महाराष्ट्रातही आकाश निरभ्र हाेईल. समुद्रसपाटी पासुन दिड किमी उंचीपर्यंत उत्तरभारतातून ताशी १० किमी. वेगाने उत्तरी थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या कोणताही अटकाव जाणवत नसल्याने विदर्भातील पारा आणखी घसरेल. मंगळवार ११ नोव्हेंबर पासुन तर पहाटेचे किमान तापमानात ३ ते ४ डिग्रीने घसरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सध्या विदर्भाचे दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंशाच्या सरासरीत आहे. नागपूरच्या कमाल तापमानात अंशत: वाढ झाली आहे, तर किमान तापमानात घट झाली आहे. मात्र अद्याप रात्रीचे तापमान सरासरीच्या वर आहे. ते दाेन दिवसात खाली येईल, असा अंदाज आहे. १७, १८ तारखेपासून थंडीत वाढ हाेईल. नाेव्हेंबर महिन्यातील किमान तापमान १० ते ११ अंशापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात आकाश निरभ्र असून येत्या काळात पावसाची काेणतीही शक्यता जाणवत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.