पतीने वैवाहिक वादामुळे आत्महत्या केल्यास पत्नी जबाबदार नाही; हायकोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:36 IST2026-04-01T17:34:40+5:302026-04-01T17:36:17+5:30
Nagpur : वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील कलह सामान्य बाब आहे. त्यामुळे पतीने केवळ अशा कलहातून आत्महत्या केल्यास त्याकरिता पत्नीला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणामध्ये दिला.

Wife not responsible if husband commits suicide due to marital dispute; High Court rules
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील कलह सामान्य बाब आहे. त्यामुळे पतीने केवळ अशा कलहातून आत्महत्या केल्यास त्याकरिता पत्नीला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणामध्ये दिला.
हे प्रकरण अमरावती येथील आहे. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी पतीने आत्महत्या केल्यामुळे राजापेठ पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. पत्नी ही पतीला शिवीगाळ व मारहाण करीत होती.
क्षुल्लक कारणांवरून भांडण करून माहेरी जात होती. पतीला खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देत होती. पैशांची मागणी करीत होती. तिचे विवाहबाह्य संबंधही होते. त्यामुळे पतीने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. न्यायालयाने केवळ या आरोपांमुळे पत्नीला पतीच्या आत्महत्येकरिता जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. या दाम्पत्यामध्ये तीव्र मतभेद होते. आत्महत्येच्या घटनेपूर्वी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप करून पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. पतीदेखील शारीरिक-मानसिक छळ करतो व त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, असे पत्नीचे म्हणणे होते. परंतु, पतीने आत्महत्या करावी, असा तिचा हेतू होता आणि तिने पतीसमोर आत्महत्या करण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय शिल्लक ठेवला नव्हता, असे पोलिसांच्या तपासात आढळून आले नाही. तसेच, सासऱ्याची तक्रार जशीच्या तशी मान्य केली तरी, पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी पत्नीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कृती केल्याचे दिसून येत नाही, असे न्यायालय म्हणाले.
वादग्रस्त एफआयआर रद्द
पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर व खटला रद्द करण्यासाठी पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पत्नीने कोणताही गुन्हा केला नसल्याचे आढळून आल्यामुळे ती याचिका मंजूर करण्यात आली.