नागपुरात मेट्रोने केले रस्ता रुंदीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:57 IST2019-06-10T22:56:41+5:302019-06-10T22:57:21+5:30
शहरात निमार्णाधीन मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.

नागपुरात मेट्रोने केले रस्ता रुंदीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात निमार्णाधीन मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.
प्रकल्पाच्या कामादरम्यान या भागात उभारलेले बॅरिकेडस् काढले आहे. रुंदीकरण आणि डांबरीकरणामुळे रस्त्यावर वाहन चालवणे आता सोयीचे झाले आहे. मार्गावर धावणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे. वाहनचालकांनी वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन महामेट्रोने केले आहे.
लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले असून रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम ७५ टक्के झाले आहे. या मार्गावर अभियांत्रिकी, वैद्यकीय, पॉलिटेक्निक तसेच इतर महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यांनी वेगावर नियंत्रण ठेवत अपघात टाळावे, असे आवाहन मेट्रोने केले आहे. सोबतच दुभाजकाचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे.
हा रस्ता महापालिकेला हस्तांतर करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंबंधीचे पत्र महामेट्रोने दिले आहे. तसेच शहर पोलीस, वाहतूक पोलीस आणि नागपूर ग्रामीणमधील संबंधित विभागांना याची माहिती दिली आहे. लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान अंबाझरी, शंकरनगर, एलएडी कॉलेज भाग वगळल्यास या मार्गावरील बहुतेक काम पूर्ण झाले आहे.
सीताबर्डी ते लोकमान्यनगर दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कार्यामध्ये व्हायाडक्टचे काम १०० टक्के तर मेट्रो स्थानकांचे काम ५२ टक्के झाले आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगरपर्यंत १०.०८ कि.मी. या मार्गावर एकूण ८ मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर हिंगणा औद्योगिक वसाहत असून तेथील कर्मचाºयाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणार आहे.