"त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? विरोधकांनी पराभव स्वीकारावा " मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले
By आनंद डेकाटे | Updated: November 15, 2025 18:49 IST2025-11-15T18:46:53+5:302025-11-15T18:49:29+5:30
Nagpur : जो जिता वही सिकंदर, विरोधकांनी पराभव स्वीकारावा, आत्मपरीक्षण करावे

"Why didn't they come up with such schemes? The opposition should accept defeat," Chief Minister Fadnavis told the opposition.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीत जय, पराजय स्वीकारायचा असतो. जो जिता वोही सिकंदर असतो. विरोधकही सत्तेत होते, त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? आम्ही त्या आणल्या, लोकांना त्या आवडल्या. त्यांनी मतदान दिले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देत विरोधकांना सुनावले.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत. तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला. दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमध्ये एनडीएच्या एवढ्या जागा जिंकून येण्यामागचं कारण तेथील महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना नागपुरात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उपरोक्त शब्दात टीका केली. तसेच मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले