महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:58 IST2025-09-19T14:57:02+5:302025-09-19T14:58:23+5:30
... या अंतःकरणाच्या हाकेला आम्ही 'ओ' दिला आणि हा मार्ग स्वीकारला.

महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
आपल्याला माहीतच आहे की आपण भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये आहोत, शिवसेना (शिंदे गट) पण आहे आपण सहयोगी आहोत. अनेक लोक मला विचारतात, हे पाऊल आपण का उचलले? वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यात आपण वेदना का स्वीकारल्या? मी तुम्हाला मनापासून सांगतो, हे सत्ता अथवा पदांसाठी उचललेले पाऊल नव्हते. महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज आहे. या अंतःकरणाच्या हाकेला आम्ही 'ओ' दिला आणि हा मार्ग स्वीकारला. हे कृपा करून महाराष्ट्राने आणि माझ्या सहकाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळते, कारण ती आलेली फाईल आम्ही क्लिअर करतो आणि नतंर ते काम मार्गी लागते, त्यातूनच आम्हाला, आमच्या मंत्र्यांना समाधान मिळते. जेव्हा एखादी फॅक्टरी, युनिट चालू करतो, त्यासाठी जमीन देतो, परवानग्या देतो, प्रश्न सोडवतो, आणि त्यामुळे हजारो तरुण-तरुणींना रोजगार मिळतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदाची जाणीव होते आणि समाधान मिळते. प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला प्रश्न विचारतो की, आज मी किती लोकांचे जीवन बदलले? हाच माझ्या यशाचा मापदंड आहे आणि हाच माज्या राजकारणाचा हेतू आहे.
आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले? काय केले? आता कालचेत उदाहरण देतो, इथे रमेश आप्पा थोरात आले असतील, त्यांनी एका ठिकाणी जेवायला बोलावले होते. आम्ही बरेच जण बसलो होतो. लोक काम सांगताना देखील फार वेगळ्या पद्धतीने सांगतात. आम्ही कार्यकर्त्यांनी काम सांगितल्यानंतर विश्वास ठेवून त्या कामात लक्ष घालतो आणि संबंधितांना बोलतो. पण कार्यकर्त्यांनीही खरं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर आमची गडबड होते. असं होऊ देऊ नका, अशी विनंतीही यावेळी अजित दादांनी कार्यकर्त्यांन केली.