अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच हलले पाय; रामटेकमध्ये १०३ वर्षांच्या आजीला मिळाले ‘नवजीवन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 21:42 IST2026-01-14T21:41:44+5:302026-01-14T21:42:12+5:30
रामटेकच्या आंबेडकर वॉर्डात वास्तव्यास असलेल्या गंगाबाई सावजी साखरे या गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होत्या. अत्यंत वृद्धत्वामुळे त्या पूर्णतः अंथरुणाला खिळल्या होत्या.

अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच हलले पाय; रामटेकमध्ये १०३ वर्षांच्या आजीला मिळाले ‘नवजीवन’
नागपूर
क्षितिजा देशमुख
मृत्यू निश्चित मानला गेला, अंत्यसंस्काराची वेळ ठरली, नातेवाईकांना निरोप गेला… आणि त्याच दरम्यान अचानक पायाच्या बोटांची हालचाल दिसली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात घडलेल्या या थक्क करणाऱ्या घटनेने एकाच क्षणात शोकाचे वातावरण आनंदात बदलले. मृत समजलेल्या १०३ वर्षांच्या वृद्ध आजी जिवंत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर अचंबित झाला.
रामटेकच्या आंबेडकर वॉर्डात वास्तव्यास असलेल्या गंगाबाई सावजी साखरे या गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होत्या. अत्यंत वृद्धत्वामुळे त्या पूर्णतः अंथरुणाला खिळल्या होत्या. बोलण्याची शक्ती गेली होती आणि केवळ पाण्यावर त्यांचा दिवस चालत होता. प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने कुटुंबीय सतत चिंतेत होते.
१२ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गंगाबाईंच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून येईना. श्वासोच्छ्वासही बंद झाल्यासारखा वाटत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना मृत मानले. लगेचच नातेवाईकांना निधनाची माहिती देण्यात आली. घरासमोर मंडप उभारण्यात आला, अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली आणि शववाहिनी बोलावण्यात आली. अंत्यसंस्काराच्या प्रथेनुसार त्यांना नवीन कपडे परिधान करण्यात आले, हात-पायांची बोटे बांधण्यात आली आणि नाकात कापूस ठेवण्यात आला.
मात्र, सायंकाळी सुमारे दोन तासांनी घडलेले दृश्य सर्वांनाच हादरवणारे ठरले. नातू राकेश साखरे यांच्या लक्षात आजीच्या पायाच्या बोटांची क्षीण हालचाल आली. प्रथम विश्वास न बसल्याने बारकाईने पाहणी करण्यात आली. तात्काळ बोटांची बांधणी सोडण्यात आली, नाकातील कापूस काढण्यात आला आणि तेवढ्यात गंगाबाईंनी दीर्घ श्वास घेतला. मृत समजलेल्या आजी जिवंत असल्याचे स्पष्ट होताच उपस्थित सर्वजण अवाक झाले.
क्षणात अंत्यविधीची सर्व तयारी थांबवण्यात आली. दरम्यान, निधनाची बातमी ऐकून दूरदूरहून काही नातेवाईक रामटेककडे निघाले होते. काहीजण हार-फुले घेऊन पोहोचले; मात्र आजी जिवंत पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ जानेवारी रोजी गंगाबाईंचा वाढदिवस होता. मृत्यूच्या छायेतून परत आलेल्या आजीला मिळालेल्या या ‘नवजीवना’च्या भावनेत कुटुंबीयांनी साधेपणाने वाढदिवस साजरा केला. काही महिन्यांपूर्वीपर्यंत दृष्टी चांगली असल्याचे सांगितले जाणाऱ्या गंगाबाईंची ही घटना सध्या रामटेक शहरात चर्चेचा विषय ठरली असून, अनेक नागरिक याकडे चमत्काराच्या नजरेने पाहत आहेत.