भारतीय संविधानाचा ड्राफ्ट टाईप करणारा ऐतिहासिक टाईपराईटर कुठे आहे?
By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 17:00 IST2025-11-26T16:59:38+5:302025-11-26T17:00:48+5:30
Nagpur : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्या काळात देशाला योग्य असे ‘संविधान’ देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

Where is the historic typewriter that typed the draft of the Indian Constitution?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्या काळात देशाला योग्य असे ‘संविधान’ देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. हे संविधान ज्या टायपरायटरवर टाइप केले गेले, तो टायपरायटर सध्या नागपुरातील चिचोली येथील शांतिवनमधील डॉ. बाबासाहेबांच्या वस्तु संग्रहालयात जपून ठेवण्यात आला आहे. याशिवाय बाबासाहेबांशी संबंधित इतर अनेक वस्तुही येथे संग्रहित आहे. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक शांतिवनला भेट देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे ‘संविधान’ दिल्लीमध्ये लिहिले आणि त्या काळातील टायपरायटरवर स्वतःच्या हाताने टाइप केले. देश घडवण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी ‘संविधान’ लिहून केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘संविधान’ पूर्ण झाले आणि २६ जानेवारी १९५० या गणतंत्रदिनी डॉ. बाबासाहेबांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देशाचे ‘संविधान’ सुपूर्द केले. त्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादुर शास्त्री, वल्लभभाई पटेल आदी थोर नेते उपस्थित होते. अतिशय परिश्रमाने हे संविधान लिहिले होते. त्यामुळे त्या ऐतिहासिक संविधानाचा मुख्य ड्राफ्ट ज्या टाईपराईटवर तयार झाला तो आपल्या नागपुरात सुरक्षित असून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
चिचोली शांतिवनाचा कार्यभार पाहणारे संजय पाटील यांच्यानुसार १९९१ साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खासगी सचिव नानकचंदजी रत्तू यांनी बाबासाहेबांचे सर्व साहित्य भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव वामनरावजी गोडबोले यांच्याकडे सुपूर्द केले. गोडबोले यांना दानात मिळालेल्या जमिनीवर शांतिवनची उभारणी करण्यात आली आणि त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोट, खुर्ची, टोपी, टाय, पेन, कप, बूट, मोजे इत्यादी वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये संविधान टाइप केलेला टायपरायटर विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे दोन टाईपराईटर आहेत. एका टायपरायटरवर ‘देशाचे संविधान’ टाइप करण्यात आले, तर दुसऱ्यावर ‘द बुद्धा अँड हिज धम्मा’ हा ग्रंथ टाइप करण्यात आला होता.