महिन्याला १३०० पोती गेली कुठे? अधिकाऱ्यांचे तोंड बंदच ! नागपूरमध्ये गरिबांच्या हक्काचे धान्य चोरीला
By नरेश डोंगरे | Updated: October 17, 2025 20:22 IST2025-10-17T20:20:27+5:302025-10-17T20:22:43+5:30
रेशन कार्डचाही घोळ : दलालांच्या माध्यमातून येताहेत प्रकार उजेडात, टीममधील बडा खिलाडी आहे तरी कोण?

Where did 1300 sacks go every month? Officials are silent! Poor people's rightful food grains stolen in Nagpur
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरगरिबांच्या ताटात अन्न वाढण्यासाठी सरकारने रेशन व्यवस्था निर्माण केली आहे. मात्र, यंत्रणेला पोखरणारी मंडळी 'काळे कारनामे' करून महिन्याला तब्बल १३०० पोती धान्य गडप करतात. खुल्या बाजारात या धान्याची पद्धतशीर विल्हेवाट लावून त्यातून लाखो रुपये गिळंकृत केले जाते. 'लोकमत'ने अन्न पुरवठा विभागातील घुसखोरीवर उजेड टाकणारी खळबळजनक मालिका सुरू केल्यानंतर यात 'दाल में कुछ काला नव्हे तर डाळच काळी' असल्यासारखा धक्कादायक प्रकारवजा माहिती संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरात असलेल्या साडेसहाशेपेक्षा जास्त रेशन दुकानदारांना त्यांच्याकडे असलेल्या कार्ड धारकांच्या संख्येनुसार रेशनचा कोटा मिळतो. त्यात प्राधान्य आणि अंत्योदय अशा दोन योजनांच्या वेगवेगळ्या रेशन कार्डचा समावेश असतो. धान्याचा कोटाही वेगळा असतो. या कार्डच्या माध्यमातूनही है प्रकार केले जात असल्याचे सांगितले जाते. वेगवेगळे दडपण आणून अनेक इमानदार दुकानदारांनासुद्धा ठरलेल्या कोट्यापेक्षा सरासरी दोन बोरी (पोते) धान्य कमी मिळत असल्याची ओरड आहे.
गब्बर यंत्रणेच्या विरोधात गेल्यास रोजीरोटीवर वरवंटा फिरू शकतो, हे ध्यानात असल्यामुळे दुकानदार भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात जात नाही. दरम्यान, दुकानदारांची संख्या आणि प्रत्येकाची दोन मोती असा ढोबळमानाने हिशेब केल्यास महिन्याला १२०० ते १३०० बोरी धान्य गडप होते. या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी भ्रष्ट मंडळींनी रेशन माफियांची एक भली मोठी टीम निर्माण करून ठेवल्याचीही माहिती आहे.
दलालांची समांतर वखार व्यवस्था
संबंधित सूत्रानुसार, या टीममध्ये या रॅकेटमधील आधीचा बडा खिलाडी मानला जाणाऱ्या वेतनचे काम आता भद्राने हाती घेतले आहे. त्याची गोदामं वेगवेगळ्या भागात आहेत. विक्कीचे गोदाम कळमना भागानजीक, रितेशचे गोदाम फिरते, सोनूचे कामती मार्गावर बबलूचे हसनबाग, ताजबागेल तर स्वीचे जरीपटक्यात गोदाम आहे. वितरण प्रणालीतून गोलमाल केलेले कोट्यवधीचे अनाज या वेगवेगळ्या गोदामात साठवले जाते.
गोरगरिबांसह सरकारलाही चोट
नमूद भागासह शहराच्या बाहेरही काही माफियांची गोदामं आहेत. या सर्व गोदामातून वसा-रात्री गोलमाल केलेल्या रेशनच्या धान्याचा काळाबाजार केला जातो. अशाप्रकारे अन्न पुरवठा यंत्रणेतील झारीचे शुक्राचार्य एकीकडे गरिबाच्या ताटातील अन्न हिसकावून घेतात. दुसरीकडे प्रामाणिक रेशन दुकानदारांना धाक दाखवून त्यांचाही कॉडमारा करतात आणि तिसरीकडे स्वतःची तुंबडी भरण्यासाठी सरकारलाही चोट देतात, अशी माहिती आहे.