कधी चालू होईल फुटाळा तलावाचे काम? दिरंगाईमुळे 'फाउंटन'चा खर्च ७५ कोटींच्यावर जाणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:12 IST2025-10-08T19:10:51+5:302025-10-08T19:12:27+5:30
Nagpur : न्यायालयीन अडथळे दूर झाले असले तरी, नासुप्रच्या (नागपूर सुधार प्रन्यास) अव्यवस्थेमुळे आणि दिरंगाईमुळे प्रकल्पाचे काम रखडले.

When will the work on Futala Lake start? Due to the delay, the cost of the 'fountain' will go up to Rs 75 crore!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जागतिक दर्जाच्या फुटाळा म्युझिकल फाउंटन आणि लाईट-शो प्रकल्पाचा खर्च आता सुमारे ७५ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला ५० कोटी अपेक्षित असताना, प्रकल्पाच्या वारंवार होणाऱ्या विलंबामुळे आणि वर्षभराच्या दुरवस्थेमुळे हा अतिरिक्त २५ कोटींचा भुर्दड माथी बसणार आहे. सप्टेंबर २०२३ पासून हा आकर्षक प्रकल्प जवळपास वर्षभरापासून ठप्प आहे, ज्यामुळे आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
न्यायालयीन अडथळे दूर झाले असले तरी, नासुप्रच्या (नागपूर सुधार प्रन्यास) अव्यवस्थेमुळे आणि दिरंगाईमुळे प्रकल्पाचे काम रखडले. तलावातील शेवाळ आणि किड्यांमुळे पाण्याखालील महागड्या वायर आणि केबल्स खराब झाल्या असून, आता प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी दुरुस्ती आवश्यक आहे. ही दुरुस्ती आणि एकूण खर्चामुळे प्रकल्पाचा आकडा ७५ कोटींपर्यंत पोहोचू शकतो, असा अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला अंदाज नासुप्रच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. केंद्रीय रस्ते निधी, राज्य सरकार आणि नासुप्र यांच्या संयुक्त निधीतून उभारलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन होण्यापूर्वीच अमिताभ बच्चन, गुलजार आणि नाना पाटेकर यांच्या आवाजातील ४० मिनिटांचा शो २०० वेळा दाखवण्यात आला होता. मात्र, नियोजनअभावी तो बंद पडला आणि नागपूरकरांसाठी तयार केलेला हा बहुमोल प्रकल्प धूळ खात पडला.
प्रकल्प कार्यान्वित करण्यात कधीपर्यंत यश येईल?
आता अखेर 'नासुप्र'ने 'खडतकर कन्स्ट्रक्शन-स्टुडिओ वन' या कंत्राटदार कंपनीसोबत तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर 'मंथन' करण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे नासुप्रचे सभापती संजय मीणा यांनी सांगितले आहे. परंतु, नागपूरकरांचा खरा प्रश्न आहे: दिरंगाईमुळे कोट्यवधींचा खर्च वाढवणाऱ्या नासुप्रला आता या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने किती वेगात आणि कधीपर्यंत पुन्हा कार्यान्वित करण्यात यश येईल? की हा ७५ कोटींचा खर्च केवळ कागदावरच राहील? नासुप्र प्रशासनाने या वाढीव खर्चाची आणि विलंबामुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी घेऊन त्वरित काम सुरू करणे अपेक्षित आहे.
"प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक बाबींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. लवकरच कामाला सुरुवात होईल."
- संजय मीणा, सभापती, नासुप्र,