जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचा फोन येतो.. जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लागतात?

By राजेश शेगोकार | Updated: December 1, 2025 14:14 IST2025-12-01T14:12:43+5:302025-12-01T14:14:14+5:30

Nagpur : मैदान खचाखच भरलेले... सभा सुरू, मग अचानक नेत्याला त्या भागातील प्रश्नाची आठवण हाेते, नेता म्हणतो, ‘थांबा… थांबा… आता मी लगेच फोन लावतो!’ आणि लगेच मंचावरून मंत्र्याला कॉल जातो.

When the Deputy Chief Minister calls, what questions of the public are addressed? | जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचा फोन येतो.. जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लागतात?

When the Deputy Chief Minister calls, what questions of the public are addressed?

नागपूर : मैदान खचाखच भरलेले... सभा सुरू, मग अचानक नेत्याला त्या भागातील प्रश्नाची आठवण हाेते, नेता म्हणतो, ‘थांबा… थांबा… आता मी लगेच फोन लावतो!’ आणि लगेच मंचावरून मंत्र्याला कॉल जातो. समस्येची माहिती दिली जाते पलीकडून ‘हो… हो… शब्द देतो… उद्याच काम सुरू!’ अशी ग्वाही मिळते अन् सभा टाळ्यांच्या आवाजाने दणाणते. जनता भारावते...याच भारावलेल्या वणी आणि पांढरकवड्याच्या जनतेत आमचा गण्या असताे..त्याच्यासाठी हे सारे अदभूत असते.. लाखाेंच्या गर्दीत थेट संवाद अन् तत्काळ समाधान...अशाच वातावरणात गण्या घरी परतताे...भारावलेपणाची धुंदी म्हणा नशा म्हणा इतकी असते की त्याला कधी गाढ झाेप लागते हे कळतही नाही..

आता हा गण्या म्हणजे काही माेठा माणूस नाही, ताे सामान्य व्यक्ती, कमावताे खाताे..वाढलेले पेट्राेल, गॅसचे दर असाे की जीएसटीचा कमी जास्त झालेला भार असाे देशभक्तीसाठी सारे काही सहन करणारा प्राणी..पण गण्या सभाेवतालच्या समस्यांनी अस्वस्थ असताे, हे प्रश्न का सुटत नाही ही चिंता त्याला सतत असते, देश आर्थिक सत्ता झाल्याचा त्याला अभिमान असताेच पण भवतालची दैना पासून ताे गलबलताे..त्याची घुसमट वाढते त्यामधून मग ताे माेठ्या आशेने इव्हीएमचे बटन दाबताे पण बाहेर येणारा निकाल पाहून चक्रावताे मात्र त्याच्या हाती काही नसते...असा हा गण्या गाढ झाेपी गेला असतानाच त्याच्या माेबाईल वाजताे...भारावलेपणाने पेंगुळलेले डाेळे स्क्रीनवरचे नावही वाचत नाही...हॅलाे काेण? असे म्हणताच आवाज येताे मी अरे मी राज्याचा उपमुख्यमंत्री बाेलताेय...सभेत तु भारावला गेला हाेता ते मला तिथून दिसले म्हणून तुझ्याशी खास बाेलत आहे...सांग काही समस्या आहे का?..हे ऐकून गण्याची झाेप तर पार उडालीच...’अच्छे दिन’ हेच नाहीत ना? असे क्षणभर त्याला चाटून गेले..पण लगेच सभेतील चित्र आठवत भानावर येत गण्या म्हणाला हाे साहेब..समस्या तर खुपच काय कुठून सुरवात करू...तुमच्याकडे एक दाेन बिबटयाने उच्छाद मांडला अन् ते राष्ट्रीय संकट झाले आमच्या चंद्रपूरात वाघ राेज एकाला खाताे, गडचिराेलीत हत्ती पायाखाली तुडवताे, गाेंदियात अस्वलांचा उच्छाद आहे अन् बिबट्याचाही त्रास आहे..हे तुमच्या पर्यत काेणी पाेहचले नाही का? तिकडून आवाज आला सगळ टिपून घेताेय तु बाेल, गण्याची हिंमत वाढली...म्हणाला कापसाची खरेदी नाही, पाखड धानाला काेणी विचारत नाही, साेयाबीनमुळे शेतकरी चिंतेत आहे. भाव नाही बाजारपेठेत लुट आहे. संत्री विकावे कुठे हा प्रश्नच आहे, रस्त्यांचे कामाचा उजेड दिसताे पण त्यात दर्जा झाेकाळला आहे, जल जीवन मिशनमध्ये फक्त कमीशनच उरले आहे. गावखेड्यात आजही बाळांतीणीला झाेळी करून न्यावे लागते. मराठी शाळा बंद हाेत आहे, काॅलेजमध्ये शिष्यवृत्ती भेटत नाही, गावागावात वाळू माफींयांचा उच्छाद आहे, नागपूरात तर दिवसाआड एक खुन पडत आहे. नाग नदीचे अन् खाणींमुळे हाेणारे प्रदूषण कमी हाेत नाही आहे... कार्यकर्ता नेता हाेत नाही नेत्याच्याच घरात तिकिट मिळते...किती सांगावे..लाडक्या बहिणी तेवढ्या थाेड्याफार खुश आहेत बाकी सगळे दाजी परेशानच...

गण्याला जसे आठवत हाेते तसे बाेलत हाेता.....शेकडाे समस्या, वर्षानुवर्ष त्याच. गण्या थांबला.. हॅलाे म्हटले, तर तिकडून आवाज आला हाे आहे सगळ बैजवार लिहून घेतले आहे. पुढच्या आठवड्यात नागपूरलाच सरकार घेऊन येताेय..बैठक लावू आणी निपटून टाकू..तुम्ही फक्त ते उद्या पालीकेला मतदानाचे बघा...गुलाल घेऊनच येताे...नेत्याने फाेन पीएला दिला व पुढच्या सभेला ते रवाना झाले...गण्या पीएला म्हणाला साहेब हे प्रश्न सुटतील ना हाे...पीएने उत्तर दिले ते फक्त ‘देवा’लाच माहित....गण्या काहो ‘दादा’ ? असे म्हणत हाेता ताेच फाेन कट झाला...आता गण्या विचारात पडला की सारे काही ‘देवा’च्याच हाती आहे...मग मला फाेन केला तरी कशाला... गण्याचा संताप वाढला फोनवरचे शब्द अजून कानात घुमत होते ‘बैठक लावू… निपटून टाकू… फक्त मतदान बघा…’ गण्या उठला, मोबाईलवर कुठलाच मिस्ड कॉल नाही. कोणताही मेसेज नाही. तेव्हा त्याला उमगले फोनवर मिळालेला न्याय, विकास, उपाय… सगळे सभाबाजारचे अफू होते.. गण्या त्या फोनकडे पाहत राहिला…आणि त्याच्या ओठातून उसळलेले शब्द संपूर्ण विदर्भाच्या मनातल्या दाहा सारखेच जळत होते. 

Web Title : उपमुख्यमंत्री का फोन: जनता के कौन से मुद्दे हल होते हैं?

Web Summary : एक आम आदमी, गण्या, उपमुख्यमंत्री के फोन के बाद खोखले वादों से मोहभंग हो जाता है, राजनीतिक बयानबाजी और वास्तविकता के बीच के अंतर को उजागर करता है, और अनसुलझे स्थानीय मुद्दों पर प्रकाश डालता है।

Web Title : Deputy CM's call: What public issues get resolved?

Web Summary : A common man, Ganya, disillusioned by empty promises after a Deputy CM's call, realizes the disconnect between political rhetoric and reality, highlighting unresolved local issues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.