व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सावधान! ...तर आपल्यावरच होईल कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 14:48 IST2021-11-19T14:45:34+5:302021-11-19T14:48:11+5:30
व्हॉट्सॲपवर एखाद्या सदस्याने जातीयवादी किंवा अश्लील पोस्ट टाकल्यास त्यासाठी ॲडमिनला दोषी मानण्यात येते. त्यामुळे ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना ताकीद देऊन ग्रुपमध्ये अशा गोष्टी व्हायरल करणाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सावधान! ...तर आपल्यावरच होईल कारवाई
दयानंद पाईकराव
नागपूर : आधुनिक काळात असा कुणीही नाही ज्याचे व्हॉट्सॲपवर अकाऊंट नाही. प्रत्येकजण विविध ग्रुपशी जुळलेला आहे. काही सामाजिक ग्रुप असतात. काही राजकीय, काही धार्मिक, क्रीडा तर अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करणारे, चिथावणी देणारे ग्रुपही असतात. एखाद्या ग्रुपवर एखाद्या सदस्याने काही आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास त्या सदस्यासह थेट ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्याची तरतूद करण्याचा कायदा आहे. त्यामुळे ग्रुप ॲडमिनने सावध राहून प्रत्येक सदस्याला तशी ताकीद देणे गरजेचे आहे.
ॲडमिनने काय काळजी घ्यावी?
-ॲडमिनने आपल्या ग्रुपमध्ये अॅड करताना संबंधित व्यक्ती कोण आहेत याची खात्री करून त्यांना ग्रुपमध्ये घ्यावे. ॲडमिनने ग्रुपमध्ये धार्मिक आणि जातीयवादी तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी पोस्ट करणाऱ्या लोकांना ग्रुपमधून काढून टाकले पाहिजे. ग्रुपमध्ये कुणीही राजकीय नेत्यांना टार्गेट केल्यास त्यातून वाद निर्माण होतो. ते टाळण्यासाठी अगोदरच सूचना देणे गरजेचे आहे. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अश्लीलला आणि १८ वर्षांखालील लहान मुलांचे फोटो, व्हिडीओ शेअर होऊ नये याची काळजी घ्यावी. एखाद्या प्रसंगी वाद निर्माण झाल्यास ग्रूप ॲडमिनच मॅसेज करू शकेल, अशी सेटिंग करून ठेवावी.
-५ वर्षांत ९ जणांवर कारवाई
व्हॉट्सॲपवर एखाद्या सदस्याने जातीयवादी किंवा अश्लील पोस्ट टाकल्यास त्यासाठी ॲडमिनला दोषी मानण्यात येते. त्यामुळे ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सक्त ताकीद देऊन ग्रुपमध्ये अशा गोष्टी व्हायरल करणाऱ्या सदस्यांवर अंकुश लावण्याची गरज आहे. मागील ५ वर्षात नागपूर शहरात जातीयवादी आणि अश्लील पोस्ट व्हायरल करणाऱ्या ९ ग्रुप ॲडमिनवर कारवाई केल्याची पोलिसांकडे नोंद आहे.
फॉरवर्ड करताय, काळजी घ्या !
-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या काही पोस्ट समाजामध्ये आणि आपल्याच शेजारी दंगे भडकवू शकतात. त्यामुळे आर्थिक व शारीरिक नुकसानीचा मोठ्या घटना घडतात. त्यामुळे अशी कोणतीही पोस्ट शेअर करू नये आणि करणाऱ्यास रोखावे. ज्यामुळे सामाजिक सौहार्दाची भावना कायम राहील.
धार्मिक भावना भडकविणाऱ्या पोस्ट टाकू नका
‘धार्मिक भावना भडकविणाऱ्या व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडीओ प्रसारित करू नये. असा आक्षेपार्ह पोस्टमुळे आपले समाजाचे आणि देशाचे नुकसान होते. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हॉट्सॲप ॲडमिनने विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.’
-केशव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, नागपूर शहर