शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

By निशांत वानखेडे | Published: December 5, 2023 04:45 PM2023-12-05T16:45:02+5:302023-12-05T16:46:26+5:30

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे.

Weather department told Farmers take care of crops, cloudy weather for 5 days | शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

नागपूर : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार पुढील पाच दिवस म्हणजे ५ ते ९ डिसेंबरदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील दाेन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला आलेला माल सुरक्षित ठेवण्याचे व शेतातील पिकांवर फवारणी टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ६ व ७ डिसेंबरला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. त्यानंतर दाेन दिवस वातावरण काेरडे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या फवारणीची कामे, तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे २-३ दिवस पुढे ढकलावी, असा सल्ला कृषी विभागाने जारी केला आहे. परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी व मळणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. मळणीची कामे शक्य नसल्यास आणि परिपक्व अवस्थेतील कापणी केलेले धान पिक शेतात पसरून ठेवले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी गोळा करून कापणी केलेला शेतमाल प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थीतीचा अंदाज घेऊन कापूस वेचणी सुरु ठेवावी. वेचणी तसेच वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. वेचणी केलेला कापूस कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. गहू, मोहरी, जवस, फळबागा तसेच भाजीपाला पिकामध्ये ओलित करणे २ ते ३ दिवस पुढे ढकलावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा, अशी सुचनाही विभागाने दिली आहे.

किडीचा प्रादुर्भाव वाढला

दरम्यान गेल्या दाेन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या रबी हंगामातील गहु, हरभरा, तुर, मोहरी, जवस, फळबागा शेतात आहेत. या पिकांवर किडीचा हल्ला हाेत असल्याने शेतकऱ्यांसमाेर संकट आहे.

Web Title: Weather department told Farmers take care of crops, cloudy weather for 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.