लहान मुलांच्या फुफ्फुसांसाठी धोक्याची घंटा; कफ सिरप तात्काळ थांबवा
By सुमेध वाघमार | Updated: November 22, 2025 18:19 IST2025-11-22T18:18:29+5:302025-11-22T18:19:18+5:30
डॉ. एस. के. काबरा : ‘पेडपल्मोकॉन-२०२५’ राष्ट्रीय परिषदेला सुरूवात

Warning sign for children's lungs; stop cough syrup immediately
नागपूर : बाजारात मिळणारे कफ सिरप अनेकदा खोकला दाबण्याचे काम करतात. यामुळे कफ बाहेर पडण्याऐवजी आतच साचून राहतो, ज्यामुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्यावर कफ सिरपचा फायद्यापेक्षा उलट त्याचे दुष्परिणामच जास्त दिसून येतात. त्यामुळे चार वर्षांखालील लहान मुलांना कफ सिरप देणे तात्काळा थांबवा, असे आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नवी दिल्ली येथील बालरोग विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ बालरोग फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. एस. के. काबरा यांनी केले.
अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्स, नागपूर शाखेच्यावतीने ‘नॅशनल रेस्पिरेटरी चॅप्टर’ची ३७वी वार्षिक राष्ट्रीय परिषद ‘पेडपल्मोकॉन-२०२५’चे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असलेले डॉ. काबरा ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, दूषीत कफ सिरपमुळे बालकांचे झालेले मृत्यू चिंता वाढविणारे आहे. सरकारने औषधी तपासणीची यंत्रणा अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे.
१०० मुलांचा मृत्यूमध्ये १५ मृत्यू निमोनियामुळे
डॉ. काबरा यांनी सांगितले, वाढते प्रदूषण व इतरही कारणांमुळे लहान मुलांमध्ये निमोनिआचे प्रमाण वाढत आहे. एक वर्षांच्या आतील १०० लहान मुलांच्या मृत्यूमध्ये १५ मृत्यू केवळ निमोनियामुळे होतात. त्यामुळे पालकांना या आजाराची माहिती असणे गरजेचे आहे. यावर प्रभावी उपचार आहेत.
लहान मुलांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण १० टक्क्यांवर
१०० क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये जवळपास १० ते १५ टक्के रुग्ण हे लहान मुले असतात. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकाक्षमता कमी राहत असल्याने त्यांच्यामध्ये क्षयरोग अधिक गंभीर होतो. याचे वेळीच निदान व पूर्ण उपचार आवश्यक आहे.
प्रदूषणांचा प्रभाव लहान मुलांच्या फुफ्फुसावर
हवेतील प्रदूषणांचा सर्वाधिक प्रभाव लहान मुलांच्या फुफ्फुसावर होतो. कारण लहान मुलांची फुफ्फुसे अजूनही विकसित होत असतात. प्रदूषित हवेमुळे त्यांच्या फुफ्फुसांच्या वाढीवर कायमस्वरूपी परिणाम होतो. लहान वयात प्रदूषणाच्या संपर्कात आलेल्या मुलांना मोठेपणी गंभीर फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.
दमा हा शब्द स्विकारा
डॉ. काबरा यांनी सांगितले, अनेकदा पालक मुलांमधील दम्याची लक्षणे ओळखण्यात उशीर करतात किंवा 'दमा' हा शब्द स्वीकारायला घाबरतात. डॉ. काबरा यांच्या मते, दम्यावर गोळ्या किंवा औषधांपेक्षा 'इन्हेलर' हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.
‘पीआयबीओ’ला नियंत्रणात ठेवता येते-डॉ. चुग
बालरोग व फुफ्फु सरोग तज्ज्ञ डॉ. क्रिष्ण चुग यांनी सांगितले, लहान मुलांमध्ये ‘पोस्ट-इन्फेक्शियस ब्रॉन्किओलायटिस आॅब्लिटर्न्स’ (पीआयबीओ) हा एक दुर्मिळ आणि दीर्घकालीन (जुनाट) फुफ्फुसाचा आजार आहे. लहान मुलांमध्ये श्वसनमार्गाच्या खालच्या भागात गंभीर संसर्ग झाल्यानंतर हा आजार उद्भवतो. यामुळे श्वासोच्छवास घेण्यास अडथळा निर्माण होतो. सध्या यावर पूर्णपणे बरा करणारा उपचार उपलब्ध नाही, परंतु लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात.
वारंवार अॅलर्जी; नाकामागील ग्रंथीला आलेली सूज-डॉ. हजारे
परिषदेचे आयोजन सचिव डॉ. शिल्पा हजारे यांनी सांगितले, मुलांमध्ये अॅलर्जीचे एक कारण म्हणजे, नाकाच्या अगदी मागे आणि घशाच्या वरच्या बाजूला असलेली ग्रंथी 'अॅडेनॉइड्स'ला आलेली सूज. दुसरे म्हणजे, ‘अॅलर्जीक रायनायटिस’ हेनाकाच्या आतील त्वचेला आलेली सूज कारण ठरते. यामुळे सतत शिंका येणे, नाकातून पाणी येणे, नाक खाजणे आणि डोळे चोळणे आदी लक्षणे दिसतात. यासाठी धूळ, प्रदूषण, परागकण किंवा विशिष्ट वासामुळे हे उद्भवते. यावर उपचार असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.