संघप्रेरणेतून विवेक ओबेरॉय नागपुरात

By Admin | Updated: June 2, 2015 02:12 IST2015-06-02T02:12:39+5:302015-06-02T02:12:39+5:30

सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय याने देशातील इतर शहरे सोडून नागपुरातच ‘रोबोटिक्स सेंटर’ सुरू करण्यासाठी पुढाकार

Vivek Oberoi from Sangparenten in Nagpur | संघप्रेरणेतून विवेक ओबेरॉय नागपुरात

संघप्रेरणेतून विवेक ओबेरॉय नागपुरात

नागपूर : सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय याने देशातील इतर शहरे सोडून नागपुरातच ‘रोबोटिक्स सेंटर’ सुरू करण्यासाठी पुढाकार का घेतला, याबाबत निरनिराळे तर्कवितर्क लावण्यात येत होते. यामागे विविध कारणे असली तरी संघप्रेरणेतूनच विवेकने नागपूरची निवड केली आहे. खुद्द त्यानेच ही बाब कबूल केली आहे. ‘रोबोटिक्स सेंटर’संदर्भात त्याने सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला भेट दिली. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान त्याने मोकळा संवाद साधला.
सुरुवातीपासूनच माझी नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळली आहे. संघाकडून नि:स्वार्थ भावनेने काम करण्यात येते. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळते. नागपूर ही संघाची कर्मभूमी आहे. हे ‘सेंटर’ मी देशात कुठेही व्यावसायिक पातळीवर सुरू करू शकत होतो. परंतु मलादेखील पैशांपेक्षा समाधान जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच मी नागपूरची निवड केली, असे तो म्हणाला. नागपुरात आल्यावर संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांची भेट घेण्याची प्रचंड इच्छा होती. परंतु वेळेअभावी ते शक्य होऊ शकले नाही, असे त्याने सांगितले. नागपुरात अनेक नामांकित शिक्षण संस्था येत आहेत. शिवाय ‘मिहान’देखील ‘टेकआॅफ’ करण्यासाठी तयार आहे. येत्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार आहेत. या शहरात विकासाची प्रचंड क्षमता आहे. ‘रोबोटिक्स’ ही काळाची गरज आहे. त्यामुळे उद्योगांना अपेक्षित असणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. यामुळे उद्योगजगत व शैक्षणिक संस्था यांच्यामधली दरीदेखील कमी होईल यात शंका नाही, असे प्रतिपादन विवेकने केले. ‘रोबोटिक्स’चा उपयोग ‘आॅटोमोबाईल इंडस्ट्री’मध्ये प्रचंड वाढला आहे. आपल्या देशात यासाठी प्रचंड वाव आहे. त्यामुळे या ‘सेंटर’मुळे कुशल मनुष्यबळ तयार होईल, असेदेखील तो म्हणाला. (प्रतिनिधी)

‘२४ बाय ७ मुख्यमंत्री’
देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्याने ‘२४ बाय ७’ मुख्यमंत्री असा केला. देवेंद्र फडणवीस हे तरुण असून कामाच्या बाबतीत एकदम चोख आहेत. ते अत्यंत ‘डायनॅमिक’ असून, त्यांच्या कार्यप्रणालीचा मी ‘फॅन’ असल्याचेदेखील विवेकने सांगितले.
‘टेक्नोसॅव्ही’ विवेक
मी अभिनेता असलो तरी ‘टेक्नॉलॉजी’चे मला खूप वेड आहे. जर्मनी येथील ‘हॅनओव्हर’ येथे गेलो असता मला तिथे चौथ्या औद्योगिक क्रांतीची तयारी दिसून आली. यात आपला देशपण समोर राहिला पाहिजे. त्सुनामीदरम्यान तामिळनाडूतील कड्डलोर जिल्ह्यातील गावांचे पुनर्वसन करत असताना मला ‘टेक्नॉलॉजी’ची मोलाची मदत झाली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता तेथून ही ‘रोबोटिक्स सेंटर’ची कल्पना सुचली असे विवेकने स्पष्ट केले.

Web Title: Vivek Oberoi from Sangparenten in Nagpur