‘सायबर क्राइम’चा ‘व्हायरस’, नागपूरकरांना ८२.८२ कोटींचा गंडा

By योगेश पांडे | Published: October 4, 2023 02:17 PM2023-10-04T14:17:04+5:302023-10-04T14:18:19+5:30

कोविडच्या ‘एन्ट्री’पासून ४४ महिन्यांत पावणेपाचशे गुन्ह्यांची नोंद : सात टक्के गुन्ह्यांचीच उकल

'Virus' of 'Cybercrime', 82.82 crores loss to Nagpur people | ‘सायबर क्राइम’चा ‘व्हायरस’, नागपूरकरांना ८२.८२ कोटींचा गंडा

‘सायबर क्राइम’चा ‘व्हायरस’, नागपूरकरांना ८२.८२ कोटींचा गंडा

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूरकोरोनानंतर उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, ‘कॅशलेस’च्या युगात आता ‘ई-सेवा’ थेट मोबाइलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवा पिढीसोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठीदेखील इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राइम’च्या प्रकरणांमध्ये देखील वाढ होत आहे. मागील ४४ महिन्यांत नागपुरात ‘सायबर’ फसवणुकीचे पावणे पाचशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारांनी या कालावधीत ८२ कोटींहून अधिकचा गंडा घातला आहे.

‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत नागपुरात ‘सायबर’ फसवणुकीचे ४८५ गुन्हे दाखल करण्यात आले. जर सरासरी काढली तर दर तीन दिवसाआड सायबर गुन्हेगारांनी एकाला ‘टार्गेट’ केले आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये थेट ऑनलाइन फसवणूक, क्रेडिट-डेबिट कार्ड फसवणूक, ऑनलाइन बॅंकिंग, ओटीपी, टेलिग्राम टास्क इत्यादींचा समावेश आहे. फसवणुकीची एकूण रक्कम ही ८२.८२ कोटी इतकी आहे. केवळ ऑनलाइन फसवणुकीचे २९८ गुन्हे नोंदविण्यात आले व त्यात ७३ कोटी ७९ लाखांची फसवणूक झाली. सर्वाधिक गुन्हे या अंतर्गतच नोंदविण्यात आले आहेत. फसवल्या गेलेल्यांमध्ये सर्वाधिक हे सुशिक्षित लोकच असून, त्यांनाच गंडा घालण्यात आला आहे.

एका ओटीपीतून सरासरी पाच लाखांची फसवणूक

सायबर क्राइम’ अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ‘क्रेडिट-डेबिट कार्ड’च्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. यासंदर्भात ४४ महिन्यांत ४५ गुन्हे दाखल झाले व त्यातून ७५.३१ लाखांची फसवणूक झाली. ऑनलाइन बॅकिंगचे ४३ गुन्हे नोंदविले गेले व फसवणुकीची रक्कम १.६७ कोटी इतकी होती. टेलिग्राम टास्कच्या नावाखाली ३३ जणांना २५.९५ लाखांचा गंडा घालण्यात आला. तर ओटीपी मागून समोरच्या व्यक्तीची फसवणूक करण्याबाबत २९ गुन्हे नोंदविले गेले व १.४५ कोटींची रक्कम उडविण्यात आली. एका ओटीपीच्या मागे सरासरी पाच लाखांची फसवणूक झाली.

केवळ सात टक्के गुन्हे उघड, तीन टक्के रक्कम परत

या कालावधीत झालेल्या गुन्ह्यांपैकी केवळ ३७ म्हणजेच ७.६२ टक्के गुन्ह्यांचीच उकल करण्यात नागपूर पोलिसांना यश आले. यात ऑनलाइन फसवणुकीच्या १६, टेलिग्राम टास्कच्या ११ गुन्ह्यांचा समावेश होता. ओटीपीच्या माध्यमातून फसवणूक व ऑनलाइन बॅंकिंगच्या एकाच गुन्ह्याची उकल झाली असून, डेबिट-क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या एकूण गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांचा गुंता सोडविण्यात आला. पोलिसांना या गुन्ह्यांमध्ये लंपास झालेल्या रकमेपैकी केवळ १.८६ कोटींचीच रक्कम परत मिळविण्यात यश आले आहे. ही रक्कम एकूण फसवणुकीच्या रकमेच्या तीन टक्क्यांहून अधिक नाही.

प्रमुख गुन्हे व नुकसान

प्रकार : गुन्हे : उघड : नुकसान :

ऑनलाइन फसवणूक : २९८ : १६ : ७३.७९ कोटी
ऑनलाइन बॅंकिंग : ४३ : १ : १.६७ कोटी

डेबिट-क्रेडिट कार्ड फसवणूक : ४५ :२ : ७५.३१ लाख
‘ओटीपी’तून फसवणूक : २९ : १ : १.४५ कोटी

टेलिग्राम टास्क : ३३ : ११ : ७२.५१ लाख
इतर : ३७ : ४.४२ कोटी

Web Title: 'Virus' of 'Cybercrime', 82.82 crores loss to Nagpur people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.