नागपूर लगतची गावे पुरात, पुरात अडकलेल्या ५० लाेकांना रेस्क्यू करण्यात यश

By निशांत वानखेडे | Updated: July 9, 2025 17:38 IST2025-07-09T17:38:06+5:302025-07-09T17:38:59+5:30

Nagpur : धुवांधार पावसाचे थैमान, तिसऱ्या दिवशीही संततधार

Villages near Nagpur flooded, 50 people trapped in flood were rescued | नागपूर लगतची गावे पुरात, पुरात अडकलेल्या ५० लाेकांना रेस्क्यू करण्यात यश

Villages near Nagpur flooded, 50 people trapped in flood were rescued

नागपूर : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यात पावसाची संततधार तिसऱ्या दिवशी अधिकच तीव्र झाली. मंगळवारी रात्रीपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून या जिल्ह्यातील अनेक गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. नागपूर शहर व शहरालगतच्या वस्त्या पुराने वेढल्या गेल्या. पुरात अडकलेल्या ५० च्यावर लाेकांना रेस्क्यू करण्यात आले. गडचिराेली, भंडारा, गाेंदियातही पुराने वेढलेल्या अनेक गावांचा संपर्कच तुटलाही आहे.

पूर्व विदर्भात सतत तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जाेर तिसऱ्या दिवशी अधिकच वाढला व आकाशातून धाे-धाे सरी बरसल्या. नागपूरला बुधवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत १२ तासात तब्बल २०२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. सकाळपासूनही पावसाच्या सरी सुरुच हाेत्या. या धुवांधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या पाेहरा नदी, पिवळी नदीचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले. पाेहरा नदीलगत नरसाळा, बेसा व पिपळा गावाला पुराने वेढा घातला. लाेकांची घरे पाण्याखाली आली हाेती. नरसाळा गावात पुरात फसलेल्या २१ लाेकांना एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. रात्री २ वाजतापासून सकाळी १० वाजतापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन चालले हाेते. पावनगाव येथील १४ लाेकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. पूर्व नागपूरची पुराने फुगलेल्या पिवळी नदीच्या काठावरील नवकन्यानगरमधील १४ लाेकांना पुरातून सुखरूप काढण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने धुवांधार बॅटिंग केली. उमरेड तालुक्यात सकाळपर्यंत विक्रमी २८४.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. ज्यामुळे शेतातील अंकूर फुटलेले धान्य पाण्याखाली बुडाले आहे.
भंडारा, गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यातही पावसाने तिसऱ्या दिवशीही थैमान घातले. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदी दुथडी वाहत असून लगतचा परिसर पाण्याखाली आला आहे. भंडारा शहरातील काही वस्त्या जलमय झाल्या. भंडारा शहरात सकाळपर्यंत १४४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. जिल्ह्यात लाखांदूर परिसरात दुसऱ्या दिवशीही १६४.४ मि.मी. पाऊस झाला. पवनी व तुमसर तालुक्यातही पावसाचा तडाखा बसला आहे. गाेसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडल्याने तिकडे गडचिराेली जिल्ह्यात पाल नदीला पूर आला. देसाईगंज तालुक्यात दुसऱ्याही दिवशी पावसाचा तडाखा बसला. गाेंदिया जिल्ह्यातही तिसऱ्या दिवशी पावसाचा जाेर तीव्रतेने कायम हाेता. त्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून मार्ग जलमय झाल्याने २० पेक्षा जास्त मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. गडचिराेली जिल्ह्यातही अनेक गावे पाण्याने वेढली गेल्याने संपर्काबाहेर गेली आहेत. गडचिराेलीचाही नागपूरची संपर्क तुटला आहे.

बुधवारी सकाळपर्यंत या भागात विक्रमी पाऊस

  • उमरेड (जिल्हा नागपूर) : २८४.२ मि.मी.
  • नागपूर शहर : २०२.४ मि.मी.
  • लाखांदूर (जिल्हा भंडारा) : १६४.५ मि.मी.
  • भंडारा शहर : १४४ मि.मी.
  • चंद्रपूर जिल्हा : चिमुर १५१.४ मि.मी., ब्रम्हपुरी १३९.८ मि.मी.
  • सडक अर्जुनी (जिल्हा गाेंदिया) : १२०.६ मि.मी.
  • हिंगणघाट (जिल्हा वर्धा) : १२८ मि.मी., वर्धा शहर ८५.२ मि.मी.

 

 

Web Title: Villages near Nagpur flooded, 50 people trapped in flood were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.