Nagpur Weather Alert: बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, त्यामुळे पुढील काही दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसेल. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२७ ऑगस्टपासून विदर्भातपाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्हे पावसाने व्यापले जातील. बुधवारी (२७ ऑगस्ट) नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. २८ ऑगस्ट रोजी विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ,चंद्रपूर या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडेल. तर नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल.
२९ ऑगस्ट रोजीही अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने इशारा दिला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गडगटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
शनिवारीही पावसाचा अंदाज
शनिवारीही (३० ऑगस्ट) यवतमाळ आणि वाशिम वगळता विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.