Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

By शुभांगी काळमेघ | Updated: August 27, 2025 20:40 IST2025-08-27T20:33:28+5:302025-08-27T20:40:22+5:30

Nagpur Rain Prediction: विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. २८ ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वतर्वला आहे.

Vidarbha Weather Alert: Heavy rain continues in Vidarbha including Gadchiroli, Chandrapur and Nagpur; Rain forecast for Saturday as well | Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Vidarbha Weather Alert: Heavy rain continues in Vidarbha including Gadchiroli, Chandrapur and Nagpur; Rain forecast for Saturday as well

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या दिशेने सरकत असल्याने पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. २६ ऑगस्टपासून चंद्रपूर आणि गडचिरोलीला जोरदार पाऊस होत असून, पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी (२७ ऑगस्ट) उपराजधानी नागपुरातही पावसाने हजेरी लावली. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागात गडगडाटासह पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.  

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचे पट्टा निर्माण झाल्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पाऊस वाढेल. २८ ऑगस्ट रोजी विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडेल. तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल.

२९ ऑगस्ट रोजीही अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गडगटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट अखेरही पावसाचा अंदाज

शनिवारीही (३० ऑगस्ट) यवतमाळ आणि वाशिम वगळता विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती
 
गडचिरोलीतील पर्लकोटावरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुका मुख्यालयासह परिसरातील शंभरहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात पुरामुळे भामरागडचा संपर्क तुटण्याची ही चौथी वेळ आहे. नव्या पुलाचे काम न्यायालयीन प्रक्रियेत खोळंबले आहे. त्यामुळे दरवर्षी पूरस्थितीत भामरागडवासीयांचे हाल होतात.

मंगळवारी (२६ ऑगस्ट) रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभीड, चिमूर या तीन तालुक्यांना मोठा फटका बसला. सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक १११.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाठोपाठ चिमूर ७७.० मिमी व नागभीड तालुक्यात ५३.३ मिमी पाऊस बरसला.

चिमूर-हिंगणगाट मार्गावर बस सेवा बंद

वर्धा जिल्ह्यातील लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडल्याने बुधवारी दुपारी ४ पर्यंत चिमूर-हिंगणगाट मार्गावरील बसगाड्या बंद होत्या. ब्रह्मपुरी तालुक्यातील भुतीनाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. अर्धवट बांधकाम आणि त्यात पाऊस झाल्याने या मार्गावर एक ट्रक पाण्यात अडकला होता.

कालव्याची पाळ फुटली

सिंदेवाही तालुक्यातील ठकाबाई तलावालगत गोसेखुर्दचा कालवा जातो. या कालव्याची पाळ फुटून त्याचे पाणी तलावात गेल्याने तलावाची पाळ फुटली. यामध्ये तलावातील पाणी आणि मच्छिमार संस्थेने सोडलेल्या मासोळ्या वाहून गेल्या. यात नुकसान झाले आहे. सिंदेवाही तालुक्यातील टेकरी गावालगतच्या नदीवर जाण्याचा मार्ग दुपारी १२ वाजतापर्यंत बंद होता.

Web Title: Vidarbha Weather Alert: Heavy rain continues in Vidarbha including Gadchiroli, Chandrapur and Nagpur; Rain forecast for Saturday as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.