विदर्भ बनतोय देशाचे 'स्टील हब' ! 'सुपर स्मेल्टर्स' उभारणार १० हजार कोटींचा पोलाद प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:01 IST2026-02-04T17:00:01+5:302026-02-04T17:01:36+5:30
Nagpur : विदर्भाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. पोलाद उत्पादन क्षेत्रातील नामांकित सुपर स्मेल्टर्स लिमिटेड ही कंपनी आता विदर्भात १० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे.

Vidarbha is becoming the country's 'steel hub'! 'Super Smelters' to set up a steel project worth Rs 10,000 crore
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :विदर्भाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. पोलाद उत्पादन क्षेत्रातील नामांकित सुपर स्मेल्टर्स लिमिटेड ही कंपनी आता विदर्भात १० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात हा भव्य स्टील प्रकल्प साकारण्याची शक्यता असून, यामुळे हजारो हातांना रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
उद्योग सचिवांशी सकारात्मक चर्चा
राज्याच्या उद्योग सचिवांशी या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, आगामी अॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवात अधिकृत सामंजस्य करार केला जाण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, सरकारने संपर्क साधण्याऐवजी कंपनीने स्वतःहून विदर्भातील संधी ओळखून असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सरकारकडे गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडला आहे.
विदर्भ बनतोय देशाचे 'स्टील हब'
गडचिरोलीतील सूरजागड येथील लोहखनिजाच्या उपलब्धतेमुळे संपूर्ण विदर्भभविष्यात देशाचे मोठे स्टील हब म्हणून उदयास येत आहे. जेएसडब्ल्यू सारख्या दिग्गज कंपन्यांचे प्रकल्प आधीच प्रगतिपथावर आहेत. सुपर स्मेल्टर्सच्या या नव्या गुंतवणुकीमुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला अधिक वेग येईल. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.
सुपर स्मेल्टर्स लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय दिल्ली आणि कोलकाता येथे आहे. साई ग्रुप ऑफ कंपनीजचा घटक असलेल्या या कंपनीची स्थापना २० जून १९९५ मध्ये झाली. कंपनी 'सुपरशक्त्ती' या लोकप्रिय बँडअंतर्गत पोलाद उत्पादनांची विक्री करते. पश्चिम बंगालमधील जमुरिया येथे कंपनीचा अत्याधुनिक एकात्मिक स्टील प्रकल्प आणि स्वतःचा वीज प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यरत आहे.