UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 18:35 IST2022-05-30T17:37:22+5:302022-05-30T18:35:38+5:30
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे.

UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा
नागपूर :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात महाराष्ट्रासह उपराजधानीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे. शुभम भैसारे (९७), सुमीत रामटेके (३५८) आणि शुभम नगरारे (५६८) अशी या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यामुळे युपीएससी, सीएसई २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. यात नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील तीन विद्यार्थी पात्र ठरले होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रशिक्षण केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होत असल्याचेही ते म्हणाले.