केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री २ जानेवारीला नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:11 IST2019-12-27T21:10:23+5:302019-12-27T21:11:29+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल.

केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री २ जानेवारीला नागपुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. यासोबतच एनडीआरएफ अकादमीचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते होईल. फायर सर्व्हीस क्षेत्रातील गॅलेंट्री अवॉर्डचे वितरण सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर सदर येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते थेट कार्यक्रम स्थळी पोहोचतील. या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री शहा नव्या राष्ट्रीय फायर सर्व्हीस कॉलेज कॅम्पस राष्ट्राला समर्पीत करतील. यासोबतच त्यांच्या हस्ते राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) अकादमीचेही उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री शहा यांच्या हस्ते प्रेसिडेंट्स फायर सर्व्हीस मेडलचेही वितरण केले जाईल. यावेळी गृहमंत्री हे नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या प्रयोगशाळेलाही भेट देतील. एनडीआरएफ अकादमी व डीआरडीओच्या मॉडेलचे प्रदर्शन यावेळी केले जाईल.
राजनाथ सिंह यांच्या हस्ते सदर उड्डाणपुलाचे लोकार्पण
सदर येथील उड्डाणपुलाचे कार्य पूर्ण झाले असून २ जानेवारीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. पश्चिम, उत्तर, मध्य नागपूरला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपुल आहे. या पुलाची एकूण लांबी ३.८ किमी असून हा पूल संविधान चौक ते जुना काटोल नाका, मानकापूरपर्यंत जोडला गेला आहे. या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला असून निर्धारित कालावधीच्या आत हा पूल तयार झाला आहे.
२ जानेवारीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र्र फडणवीस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार विकास महात्मे, आ. विकास ठाकरे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ.मोहन मते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी सदर उड्डाणपुलाची पाहणी केली.