शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन जणांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 22:26 IST2025-07-30T22:25:31+5:302025-07-30T22:26:15+5:30

शालार्थ आयडी घोटाळ्यात गठीत ‘एसआयटी’ने बुधवारी मोठी कारवाई केली.

Two people arrested in Shalarth ID scam, SIT takes major action! | शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन जणांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई!

शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन जणांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई!

शालार्थ आयडी घोटाळ्यात गठीत ‘एसआयटी’ने बुधवारी मोठी कारवाई केली. पोलिसांनी विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलीस सत्र न्यायालयात ‘रिव्हिजन’ अर्ज दाखल करणार आहेत. राज्यस्तरीय एसआयटी गठीत झाल्यानंतरची ही पहिली मोठी कारवाई आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हे प्रकरण लावून धरले आहे हे विशेष.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ आयडीचे आदेश जारी झाले नव्हते. मात्र शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट आयडी तयार केले. त्या माध्यमातून बोगस शिक्षकांना शासनाकडून वेतनदेखील अदा करण्यात आले. या घोटाळ्यात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अगोदर नागपूर पोलीस व आता राज्यपातळीवरील ‘एसआयटी’कडून याचा तपास सुरू आहे. अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले.

५० वर्षीय सिद्धेश्वर श्रीराम काळुसे हे १६ मार्च २०२४ पासून आजपर्यंत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर रोहिणी विठोबा कुंभार (४९) या २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत शिक्षणाधिकारी होत्या. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांनी दोघांनाही बुधवारी अटक केली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पोलिसांकडून या आदेशाविरोधात वरिष्ठ न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

तीन वर्षांत ३९८ बोगस शालार्थ आयडी
रोहिणी कुंभार व सिद्धेश्वर काळुसे यांच्या हाती मार्च २०२२ पासून प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून धुरा होती. कुंभार यांच्या जवळपास दोन वर्षांच्या कार्यकाळात २४४ बोगस शालार्थ आयडी जारी झाले. त्यानंतर काळुसेच्या कार्यकाळात १५४ बोगस शालार्थ आयडी निघाले. तीनच वर्षांत ३९८ बनावट शालार्थ आयडी जारी झाले व त्या शिक्षकांचे वेतनदेखील अदा करण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ही वेतन प्रक्रिया राबविली. त्या माध्यमातून त्यांनी तीनच वर्षांत राज्य शासनाची शंभर कोटींहून अधिकची फसवणूक केली असल्याची बाब चौकशीतून समोर आल्याची ‘एसआयटी’चे प्रमुख व झोन-२ चे उपायुक्त नित्यानंद झा यांनी माहिती दिली.

आतापर्यंत १४ जणांना अटक
शालार्थ आयडी घोटाळा व बोगस मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात आतापर्यंत २० हून अधिक जणांना अटक झाली आहे. एकट्या शालार्थ आयडी घोटाळ्यात १४ जणांना अटक झाली आहे. त्यात तीन विभागीय शिक्षण उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, दोन शाळा संचालक, दोन मुख्याध्यापक व चार लिपिकांचा समावेश आहे.

Web Title: Two people arrested in Shalarth ID scam, SIT takes major action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.