नागपुरात हिट ॲंड रनच्या आणखी दोन घटना, दोघांचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: July 9, 2024 16:09 IST2024-07-09T16:08:31+5:302024-07-09T16:09:19+5:30
Nagpur : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात

Two more incidents of hit and run in Nagpur, two dead
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत हिट ॲंड रनच्या घटना सुरूच असून दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला. कपिलनगर व वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले.
पहिला अपघात कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. भावेश रविंद्र भरणे (२७, विदर्भ कॉम्प्लेक्स, संगम टॉकीजजवळ) हा बारा वाजताच्या सुमारास मोटारसायकलने कामगार नगर चौकाजवळील पेट्रोल पंपासमोरून जात असताना एमएच ४० सीटी ४५६६ या क्रमांकाच्या टिप्परने त्याला जोरदार धडक दिली. टिप्परचालक राधेश्याम हिरालाल रहांगडाले (५३, कांद्री, कन्हान) हा वेगाने टिप्पर चालवत होता व त्यामुळे भावेश खाली पडला. अपघातानंतर राधेश्याव घटनास्थळावरून फरार झाला. भावेशला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा भाऊ कार्तिक याच्या सूचनेवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वर्षीय मुलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरविले
भावेशला दोन वर्षांची मुलगी असून या अपघातामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. काम आटोपून परत येतो असे सांगून भावेश निघाला होता. त्याने भावाला मोबाईलमध्ये रिचार्ज करून देण्यासाठी फोनदेखील केला होता व त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
रस्ता ओलांडताना गेला जीव
दुसरा अपघात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. प्रकाश अशोक महंत (२९, तुलसीनगर, भांडेवाडी) हा त्याच्या दुचाकीने घराबाहेर निघाला होता. तरोडी खुर्द येथील उड्डाणपुलावर दुचाकी उभी करून पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनचालकाने त्याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. प्रकाशला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा भाऊ राकेश याच्या तक्ररीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.