बारबालावर उधळली लुटलेली रक्कम; 'त्या' दोघांना अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:08 IST2023-06-23T13:04:32+5:302023-06-23T13:08:01+5:30
मुंबईत वातानुकूलित हॉटेलमध्ये थांबून केला ‘एन्जॉय’

बारबालावर उधळली लुटलेली रक्कम; 'त्या' दोघांना अखेर अटक
नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत भारत गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाकडून तीन लाख रुपये लुटून ही रक्कम मुंबईत डान्सबारमध्ये बारबालांवर उधळणाऱ्या दोन आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे.
तपिश बागडे आणि ऋषभ कावळे (रा. जरीपटका) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत राणी दुर्गावती चौकात गजभिये यांची भारत गॅस एजन्सी आहे. एजन्सीत पखाले (वय ६०) हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी १७ जूनला दुपारच्या सुमारास तीन लाखांची रक्कम घेऊन पखाले स्कूटीने जात होते. दरम्यान, लघुवेतन कॉलनीजवळ डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या मागील भागात आरोपींनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारल्यामुळे ते खाली पडले. त्याच वेळी आरोपींनी त्यांच्या जवळील तीन लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढला होता.
याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परंतु आरोपींचा शोध लागत नव्हता. रक्कम लुटल्यानंतर आरोपी मुंबईला गेले. तेथे वातानुकूलित खोलीत राहून चांगले जेवण आणि बारमध्ये जाऊन बारबालांवर पैसे उधळत होते. तीन चार दिवस त्यांनी ‘एन्जॉय’ केला. पोलिसांना माहिती होऊ नये यासाठी त्यांनी नवा मोबाइल खरेदी करून सिमकार्डही बदलले. परंतु त्यांच्या मागावर असलेल्या जरीपटका ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल, उपनिरीक्षक गजानन निशिथकर, अमोल हरणे यांनी त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले.