त्रिभाषा धोरण निश्चिती समिती शुक्रवारी येणार नागपुरात; मते मांडण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
By आनंद डेकाटे | Updated: October 8, 2025 20:11 IST2025-10-08T20:10:23+5:302025-10-08T20:11:34+5:30
नागरिक आणि विविध क्षेत्रातील तज्ञांची मते जाणून घेणार : नियोजन भवन येथे दिवसभर संवाद साधणार

Trilingual Policy Determination Committee to arrive in Nagpur on Friday; Citizens urged to attend to express their views
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही त्रिभाषा धोरण निश्चित समिती येत्या शुक्रवारी १० आक्टोबर रोजी नियोजन भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी व त्यांची मते जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
समिती सदस्यांमध्ये भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) संचालक डॉ. वामन केंद्रे ,शिक्षणतज्ज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, पुण्याच्या डेक्कन काॅलेजच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी जोशी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मधुश्री सावजी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, तर राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान, मुंबईचे संजय यादव हे सदस्य सचिव आहेत. ही समिती १० ऑक्टोबर रोजी नागपूर विभागातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत व आंदोलक यांची मते जाणून घेण्याकरिता नागपूर येथे दौऱ्यावर आहेत.
तरी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत व आंदोलक यांना राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्रबाबत समिती समोर मते, विचार व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांकरिता आपली मते, विचार व्यक्त करण्याकरिता समितीच्या Website :- tribhashasamiti.mahait.org संकेतस्थळावर सुध्दा व्यवस्था करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.