नागपुरातील कामगार विमा सोसायटीचे मेडिकल कॉलेज पळविण्याचा 'घाट'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:54 IST2026-01-13T15:46:50+5:302026-01-13T15:54:05+5:30
Nagpur : मेडिकल विद्यापीठानंतर दुसरा धक्का बसणार का? प्रस्ताव अजूनही केंद्रापर्यंत पोहोचलाच नाही

Trick to steal the medical college of the Workers' Insurance Society in Nagpur!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानी नागपूरच्या वाट्याला आलेले महत्त्वाचे प्रकल्प पळविण्याचा जुना आणि कुप्रसिद्ध 'खेळ' पुन्हा एकदा सुरू झाला आहे. केंद्र सरकारने नागपुरात महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे (ईएसआयसी) मेडिकल कॉलेज देण्याची अधिकृत घोषणा केली. मात्र, ही घोषणा कागदावरच राहावी आणि प्रत्यक्षात हे कॉलेज नागपुरातून हिरावून घेतले जावे, यासाठी जोरात प्रयत्न सुरू झाले आहेत.
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या पुढाकाराने २०२४ मध्ये देशातील १० मोठ्या शहरांत 'ईएसआयसी' मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर या दोन शहरांचा स्पष्ट उल्लेख होता. आज पुणे आणि इतर राज्यांतील शहरांमध्ये कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली वेगात असताना, नागपूर मात्र जाणीवपूर्वक मागे टाकले जात आहे. नागपूरचा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलाच नाही. हा निष्काळजीपणा आहे की जाणीवपूर्वक केलेला डाव, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
जर येथे मेडिकल कॉलेज सुरू झाले, तर एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळेल, पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होऊन रुग्णांना सुपर स्पेशालिटी उपचार मिळतील आणि थेट १७ लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल. मात्र, हे कॉलेज नागपुरातून पळवले गेले, तर गरीब कामगारांच्या अद्ययावत उपचारांवर गदा येणार आहे.
१७ लाख कामगारांच्या आरोग्यावर गदा
विदर्भातील एकमेव 'ईएसआयसी' रुग्णालय नागपुरातील सोमवारी पेठ येथे आहे. मोठी जागा असूनही साधनसामग्री आणि डॉक्टरांची कमतरता असल्याने येथे उपचारांऐवजी रुग्णांना 'रेफर' केले जाते.
आरोग्य विज्ञान विद्यापीठानंतर मेडिकल कॉलेजवर डल्ला?
नागपूरहून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकला पळविण्याचा कट राज्याने आधीच पाहिला आहे. आता 'ईएसआयसी' मेडिकल कॉलेजचाही तोच खेळ खेळला जातो आहे का? अशी चर्चा आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशिक लॉबी राज्यातील काही वरिष्ठ अधिकारी आणि एका मंत्र्याच्या संगनमताने हे मेडिकल कॉलेज नागपुरातून नाशिकला वळविण्याचे प्रयत्न करीत आहे.
विशेष म्हणजे, राज्य सरकारला २८ जानेवारीपर्यंत 'नॅशनल मेडिकल कमिशन'ला (एनएमसी) पत्र पाठवायचे आहे, ज्यात 'ईएसआयसी' रुग्णालयाचा ताबा आणि कॉलेजसाठी स्थळाचा स्पष्ट उल्लेख आवश्यक आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अंधारात ठेवले जात असल्याची गंभीर माहिती आहे.
"नागपूरच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेजसाठी अद्याप प्रस्ताव तयार केलेला नाही. प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या सूचनेनंतर लवकरच प्रस्ताव तयार करून पाठविला जाईल."
- रमेश चव्हाण, आयुक्त, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ईएसआयसी)