नरेश डोंगरे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सेलू ते सिंदीदरम्यान १८ किलोमीटरच्या थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम पूर्ण झाले आहे. त्याची क्षमता आणि सुरक्षा तपासणी २७ आणि २८ मार्चला पार पडणार आहे. यावेळी या मार्गावर ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालवून या नव्या मार्गाची क्षमता तसेच सुरक्षेची तपासणी केली जाणार आहे.
नागपूर वर्धा रेल्वे मार्गावर असलेल्या सेलू-सिंदीदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या तिसऱ्या आणि चाैथ्या लाइनच काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. मात्र, या नवीन लाइनवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यापूर्वी ही लाइन वाहतुकीसाठी सक्षम आणि सुरक्षित आहे की नाही, त्याची खात्री करून घेतली जाणार आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) वेग चाचणी (स्पीड टेस्ट) घेण्यासाठी २७ आणि २८ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने स्पीड टेस्टची तयारी केली आहे. या दोन दिवसांत या मार्गावरून रेल्वे गाडी अतिवेगात (ताशी १२० ते १३० किलोमीटर) धावणार असल्याने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. या मार्गावर काम करणारे रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नमूद तारखेला कुणीही रेल्वे मार्ग ओलांडू नये तसेच या लाइनपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गाड्या रेंगाळण्याचे प्रमाण होणार कमीनागपूर-मुंबई आणि नागपूर-चंद्रपूरला जोडणारा हा रेल्वे मार्ग असल्यामुळे या मार्गावर गाड्यांची सारखी वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा दुसरी गाडी पास करण्यासाठी पहिल्या गाडीचा वेग कमी केला जातो. अर्थात अशाच प्रकारे अनेक गाड्या दिवसभरात रेंगाळतात. नवीन लाइनमुळे नागपूर ते वर्धादरम्यान रेल्वेगाड्या रेंगाळण्याचा प्रकार थांबणार आहे.