ट्रॅफिक पोलिसाची भाईगिरी

By Admin | Updated: June 13, 2015 03:00 IST2015-06-13T03:00:30+5:302015-06-13T03:00:30+5:30

सामान्य नागरिकांना पोलिसांचा कोणताही त्रास होणार नाही. नागरिकांमध्ये मिळून मिसळून पोलीस काम करतील, असे आश्वासक बोल पोलीस आयुक्त जाहीरपणे ऐकवत आहेत.

Traffic Police's Brotherhood | ट्रॅफिक पोलिसाची भाईगिरी

ट्रॅफिक पोलिसाची भाईगिरी

गरीब तरुणावर अन्याय : सांगा सीपी साहेब, आता कसे करायचे ?
नरेश डोंगरे नागपूर
सामान्य नागरिकांना पोलिसांचा कोणताही त्रास होणार नाही. नागरिकांमध्ये मिळून मिसळून पोलीस काम करतील, असे आश्वासक बोल पोलीस आयुक्त जाहीरपणे ऐकवत आहेत. मात्र, आयुक्तांचे हे बोल पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानावर गेलेले नाही. त्याचमुळे की काय, पोलिसांची हेकेखोरी, उर्मटपणा कायमच आहे. गुरुवारी रात्री पुन्हा त्याची प्रचिती आली. परिस्थितीशी झुंज देऊन भविष्याचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी छळ छळ छळले. वाहतूक पोलिसांचे हे पाप उघड करून न्याय मिळवण्यासाठी धावपळ करणाऱ्या या तरुणाला अंबाझरी पोलीस अन् नियंत्रण कक्षानेही झटकले. प्रचंड संतापजनक असा हा घटनाक्रम गुरुवारी रात्री ८ ते ९ या कालावधीतील आहे.
कुणाल शरद नगरकर (वय २४) हा तरुण रामनगरमध्ये राहातो. घरची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. रोजच्या जगण्यासाठी त्याला अन् त्याच्या कुटुंबीयांना रोजच संघर्ष करावा लागतो. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कुणाल एका खासगी कंपनीत काम करतो. काम संपल्यानंतर मिळेल तेवढ्या वेळेत त्याचा अभ्यास सुरू असतो. गुरुवारी अशाच प्रकारे काम आटोपल्यानंतर रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान तो गोकुळपेठ बाजारातून भाजी घेऊन घराकडे निघाला. चौकात त्याला पांडे नामक एका वाहतूक पोलिसाने अडवले. ‘दारू पिके है क्या‘,असे विचारले. नाही म्हणताच कागदपत्रांची मागणी केली. दुचाकीची कागदपत्रे (आरसी बुक) दिल्यानंतर फालतू प्रश्न विचारत त्याला अंबाझरी ठाण्यात नेण्यात आले. तेथे चिरीमिरी घेण्याचे प्रयत्न झाले. कुणालकडे पैसे नव्हतेच, त्यामुळे देण्याचा प्रश्नच नव्हता. परिणामी दारू पिऊन वाहन चालविण्याचा आरोप करीत त्याच्या हातात वाहतूक पोलिसाने चालान दिले. ‘आपण दारू पीत नाही, एक थेंबही पिलेलो नाही, पाहिजे तर मेडिकल करा‘, अशी आर्जव कुणाल करीत होता. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखवून गप्प करण्यात आले. वाहतूक पोलिसांकडून धाकदपटशा झाल्यामुळे कुणालने पोलीस ठाण्यातील काहींना विनंती केली. ‘आपले मेडिकल करा, मी दंड भरू शकत नाही‘, असे सांगितले. मात्र, त्याला दाद मिळाली नाही. त्यांनीही वाहतूक पोलिसांची कारवाई आहे. आता आमची ड्युटी संपत आहे, असे सांगून त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला.

Web Title: Traffic Police's Brotherhood