नागपुरात मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 09:50 PM2019-09-25T21:50:12+5:302019-09-25T23:16:23+5:30

दोन दिवस तुरळक प्रमाणात आल्यानंतर बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह तासभर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभरात शहरामध्ये ४८.१ मिमी पावसाची नोंद झाली.

Torrential rains in Nagpur | नागपुरात मुसळधार पावसाने झोडपले

नागपुरात मुसळधार पावसाने झोडपले

Next
ठळक मुद्देदिवसभरात ४८.१ मिमी पावसाची नोंद : रस्ते जलयम, सखल भागात पाणीच पाणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दोन दिवस तुरळक प्रमाणात आल्यानंतर बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह तासभर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभरात शहरामध्ये ४८.१ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले तर सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, वातावरणात दिवसभर थंडावा जाणवत होता. 

 
बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात ४.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळपासून शहरात काळे ढग दाटून आले होते. दुपारी ११.३० नंतर पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. तासभर पावसाचा जोर जास्त होता. अनेक रस्ते खड्डेमय झाले असून त्यात पाणी जमल्याने वाहनचालकांची वाहने चालविताना कसरतच झाली. मेट्रो रेल्वे कॉरीडोर, पारडी आणि सदर येथील निर्माणाधीन उड्डाण पूल, अपूर्ण कार्य झालेले सिमेंट रस्ते या ठिकाणी पाणी जमले होते. शिवाय जुना भंडारा मार्ग, रेल्वे क्रॉसिंगजवळ गुडघाभर पाणी होते. सूर्यनगर परिसरातदेखील अशीच स्थितीत होती. लोखंडी पुलाजवळील माता मंदिर व मानस चौकात तर खड्ड्यांत पाणी जमले होते व यामुळे काही वाहनचालकांना प्रचंड अडचण झाली. नरेंद्र नगर पुलाखालीदेखील पाणी जमा झाले होते. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. उत्तर व पश्चिम नागपुरातील अनेक भागांतदेखील पाणी साचले होते.
वातावरणात थंडावा
मागील काही दिवसांपासून शहरातील वातावरणात काहिसा उकाडा वाढला होता. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे थंडावा निर्माण झाला. शहरात कमाल २८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ४.५ अंशांनी कमी होते तर किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सरासरीहून अधिक पाऊस
नागपुरात २५ सप्टेंबरपर्यंत १०९७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीहून हे प्रमाण २३ टक्क्यांनी अधिक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत तसेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलादेखील पाऊस राहणार आहे. शिवाय पुढील २४ तासांत देखील पाऊस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Torrential rains in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.