चिमुकला रेल्वे बर्थवरून खाली पडला अन् आईच्या आक्रोशाने प्रवाशी झाले सुन्न; केरळ एक्सप्रेसमध्ये स्तब्ध करणारी घटना
By नरेश डोंगरे | Updated: November 17, 2025 19:29 IST2025-11-17T19:29:07+5:302025-11-17T19:29:38+5:30
केरळ एक्सप्रेसमधील घटना : गाडीची धडधड अन् नातेवाईकांचा आक्रोश

Toddler falls off railway berth, mother's screams leave passengers speechless; Shocking incident on Kerala Express
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालकांचे थोडेसे दुर्लक्ष झाले अन् दीड वर्षाचा चिमुकला बर्थवरून खाली पडला. पालकच नव्हे तर कोचमधील सर्वच प्रवाशांच्या काळजात धस्स करणारा हा प्रसंग होता. निरागस चिमुकला शांत झाल्याने पालकांनी आक्रोश सुरू केला. मात्र, प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केली अन् काही वेळेतच चिमुकला हसू लागला. ट्रेन नंबर १२६२५ केरळ एक्सप्रेसमध्ये अनेकांचा जीव भांड्यात टाकणारी ही घटना घडली.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एक परिवार केरळ एक्सप्रेसमधून नागपूर ते ईटारसी प्रवास करीत होता. थंडीच्या दिवसांमुळे आई आपल्या चिमुकल्याला घेऊन वरच्या बर्थवर लेटली होती. तिचे काहीसे दुर्लक्ष झाले आणि तिच्या कुशीतील चिमुकला धडकन् खाली पडला. काही वेळ जोरजोरात रडल्यानंतर तो शांत झाला. यावेळी गाडी भोपाळहून पुढे निघाली होती. गाडीची धडधड सुरू असतानाच चिमुकल्याने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवली होती. त्याच्या आईचा तर आक्रोश बघवत नव्हता. डब्यात या घटनेने चिंताग्रस्त वातावरण निर्माण केले. दरम्यान, एका प्रवाशाच्या माध्यमातून रेल्वेच्या रनिंग स्टाफला (कर्मचाऱ्याला) ही माहिती कळविण्यात आली. त्याने प्रसंगावधान राखत भोपाळ रेल्वे कंट्रोलला कळविले. कंट्रोलच्या स्टाफने ईटारसी स्थानकावर घटनेची माहिती देऊन वैद्यकीय मदतीसाठी एक पथक सज्ज ठेवण्यास सांगितले. त्यानुसार, गाडी ईटारसी स्थानकात पोहचताच चिमुकल्यावर तातडीने उपचार करण्यात आले. काही वेळेतच त्याने उपचाराला प्रतिसाद दिला अन् तो हसू लागला. त्याच्या आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्यानंतर तो सुखरूप असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांना आवश्यक औषधे सोबत देऊन पुढच्या प्रवासासाठी परवानगी देण्यात आली.
कृतज्ञतेची भावना तरळली
चिमुकला सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याच्या आईवडिलांसह अन्य नातेवाईकांच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना तरळली. त्यांनी रेल्वेच्या रनिंग स्टाफ आणि डॉक्टरांचे आभार माणून आपल्या घरचा मार्ग धरला.