नागपुरातील एका बेरोजगार व्यक्तीने घटस्फोटानंतर पत्नीला न्यायालयाने दिलेल्या पोटगीचे पैसे भरण्यासाठी सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मानकापूरमधील गणपतीनगर येथील रहिवासी कन्हैया नारायण बौरशी याला पोलिसांनी अटक केली. या घटनेबाबत कळताच कन्हैयाचे नातेवाईक शॉक झाले.
दरम्यान, २२ फेब्रुवारी मनीषनगरमध्ये ७४ वर्षीय जयश्री जयकुमार गाडे यांनी त्यांची सोनसाखळी चोरीची बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवून नेल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने पोलिसांनी कन्हैयाचा शोध घेतला. चौकशीदरम्यान, कन्हैयाने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. तसेच त्याने आतापर्यंत चार वेळा चोरी केल्याचे सांगितले. कारण न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला पत्नीला दरमहा ६००० रुपये पोटगी देणे बंधनकारक आहे.
दोन वर्षांहून अधिक काळ बेरोजगार असलेल्या कन्हैयाने सांगितले की, कोरोनामुळे त्याची नोकरी गेली. उत्पन्नाचा कोणाताही स्थिर स्त्रोत नसल्याने त्याला आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि घरातील खर्च भागविण्यासाठी गुन्हेगारीकडे वळल्याचा त्याने दावा केला. या कारवाईत पोलिसांनी एक मोटारसायकल, एक मोबाईल आणि १० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे १.८५ लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.