काळ पुन्हा पलटून आला.. पहिल्यांदा अपघातात बचावले पण दुसऱ्या घटनेत दोघ मित्रांना काळाने गाठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 19:07 IST2026-02-25T19:06:33+5:302026-02-25T19:07:20+5:30
Nagpur : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली मोटरसायकल स्लीप झाली आणि त्यात दोघे जखमी झाले. प्रथमोपचारानंतर दोघांनीही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि मोटरसायकल जोरात दुभाजकावर आदळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

Time turned around again.. The first time they escaped the accident, but in the second incident, time caught up with the two friends.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली मोटरसायकल स्लीप झाली आणि त्यात दोघे जखमी झाले. प्रथमोपचारानंतर दोघांनीही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि मोटरसायकल जोरात दुभाजकावर आदळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. यात एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कट्टा शिवारात सोमवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
पुनित ऊर्फ साजन ईमरतलाल कुडोपा (२७, रा. भमोडी-घनसोर, जिल्हा सिवनी, मध्य प्रदेश) व मोहित रामू खोडकर (३०, रा. साडगाव-पालांदूर, ता. लाखनी, जिल्हा भंडारा) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मित्र असून, ते नागपूर शहरातील मानेवाडा भागात किरायाने राहायचे. पुनित टाइल्स बसविण्याचे तर मोहित वाहन चालक म्हणून काम करायचा. पुनितच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम असल्याने दोघेही सिवनीकडे जात होते. सिवनीला जाण्यासाठी नातेवाइकाला एमएच-३६/एएस-७४६० क्रमांकाची मोटरसायकल मागितली होती.
मनसर (ता. रामटेक) परिसरात मोटरसायकल स्लीप झाल्याने दोघेही खाली कोसळले व जखमी झाले. त्यांच्यावर मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला असताना दोघेही त्याच मोटरसायकलने नागपूरऐवजी सिवनीच्या दिशेने निघाले. रामटेक तालुक्यातील कट्टा-रामनगर दरम्यान मोटरसायकल जोरात दुभाजकावर आदळली. यात पुनितचा घटनास्थळीच तर मोहितचा नागपूरला उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
सोशल मीडियावर पटली ओळख
अपघात होताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले. गंभीर दुखापतीमुळे दोघेही शुद्धीवर नसल्याने ते त्यांची नावे व पत्ता सांगू शकत नव्हते. शिवाय, त्यांच्या खिशात ओळख सांगणारा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी या अपघाताची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आणि काही वेळाने त्यांची ओळख पटली. तोपर्यंत दोघांच्याही मृतदेहांची उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपली होती. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केले.