Three arrested for making fake audio clips about Corona | CoronaVirus: तुकाराम मुंढे अन् सायबर सेलनं करून दाखवलं; 'ती' ऑडिओ क्लिप बनवणारे त्रिकूट जेरबंद

CoronaVirus: तुकाराम मुंढे अन् सायबर सेलनं करून दाखवलं; 'ती' ऑडिओ क्लिप बनवणारे त्रिकूट जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: नागपुरात ५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, मात्र ही माहिती दडविली जाते आहे अशा प्रकारचे संभाषण असलेली ऑ डिओक्लिप बनवणाऱ्या तिघांना सायबर सेलने शुक्रवारी अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले.

जय गुप्ता (३७), अमित पारधी (३८) आणि दिव्यांशू मिश्रा (३३) अशी या आरोपींची नावे आहेत. गुप्ता आणि पारधी या दोघांचे संभाषण यात आहे. सदर पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारामागे गुप्ता हा मूळ कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.

या क्लिपचा जनक शोधण्यासाठी सायबर सेलने गेल्या दोन दिवसांपासून जंग जंग पछाडले. यात ३५ जणांची चौकशी करण्यात आली. सायबर सेलचे विशाल माने, केशव वाघ, अश्विनी जगताप, अंडर डिसीपी श्वेता खेडेकर, जॉईंट सीपी रविंद्र कदम, अ‍ेडिशनल सीपी क्राईम निलेश भरणे आणि पोलीस आयुक्त बी.के. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात या चमूने काम केले.

नागपूरमध्ये ५९ पॉझिटीव्ह रुग्ण २०० पेक्षा जास्त संशयित आहेत, तर डॉक्टरही व्हेंटीलेटरवर आहेत, अशा आशयाचा हिंदीतील संवाद असलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप साफ खोटी असून कुणीही फॉरवर्ड करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होती. तसेच, ती ऑडिओ क्लिप साफ खोटी असून त्या क्लिपमधील संवाद करणाऱ्या दोन्ही व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी सांगितले होते. त्यानंतर, सायबर सेलची शोधमोहीम यशस्वी झाली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा त्याच्या अफवाच जास्त पसरत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावरुन काही क्षणातच या अफवा शहरभर होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन शहरात भीतीचे वातावरण तयार होते. या संपूर्ण परिस्थितीचा ताण प्रशासनावर येतो. मात्र, नागरिक खात्री न करता, किंवा संबंधित बाबीची प्रशासनाकडे माहिती न देता, अशा क्लिप व्हायरल करतात. त्यामुळे या अफवा कोरोनापेक्षा जास्त वेगाने पसरतात. मात्र, ती अफवा असल्याची बातमी तितक्या वेगाने पसरत नाही, हे दुर्दैव. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथेही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. पुणे आणि बार्शीतील दोन मित्रांचा तो संवाद सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्यामध्ये एक संशयित रुग्ण पुण्यातून बार्शीला आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, तपासाअंती ती ऑडिओ क्लिप फेक असून संवाद करणारी व्यक्ती दारुडी असल्याचे उघड झाले. त्यानंतर, बार्शीतही याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. 

Web Title: Three arrested for making fake audio clips about Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.