राज्यामध्ये दीड महिन्यात साडेतीन टक्के तूर खरेदी; एमएसपी दराने खरेदीचे वांधे
By सुनील चरपे | Updated: March 11, 2026 14:31 IST2026-03-11T14:24:34+5:302026-03-11T14:31:31+5:30
Nagpur : राज्यात एमएसपी दराने ३.३७ लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, नाफेड व एनसीसीएफने २० जानेवारीपासून नोंदणी व १ फेब्रुवारीपासून खरेदीला प्रारंभ केला.

Three and a half percent tur purchase in the state in one and a half months; Purchase restrictions at MSP rate
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात एमएसपी दराने ३.३७ लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, नाफेड व एनसीसीएफने २० जानेवारीपासून नोंदणी व १ फेब्रुवारीपासून खरेदीला प्रारंभ केला. दोन्ही संस्थांनी दीड महिन्यात एकूण उद्दिष्टाच्या ३.६८ टक्के म्हणजेच १२,४०४.९८८६ टन तुरीची खरेदी केली. नोंदणी व खरेदीचा वेग अतिशय संथ असल्याने खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारने सन २०२५-२६ च्या हंगामासाठी तुरीची एमएसपी आठ हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली असून, सध्या खुल्या बाजारात चांगल्या प्रतिच्या तुरीला प्रतिक्विंटल ७,००० ते ७,६०० रुपये दर मिळत आहे. मध्यंतरी तुरीच्या दराने आठ हजार रुपयांची पातळी ओलांडली होती. त्यातच भारतीय व्यापाऱ्यांनी जानेवारीमध्ये म्यानमारच्या 'लेमन' तुरीचे सौदे केले. ती तूर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून भारतात यायला सुरुवात झाली व जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून दर दबावात आले. त्यापूर्वी नाफेड व एनसीसीएफने २० जानेवारीपासून नोंदणी आणि १ फेब्रुवारीपासून खरेदीला सुरुवात केली. दर दबावात आल्याने शेतकऱ्यांनी या संस्थांकडे नोंदणीला प्राधान्य दिले. वास्तवात, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात तुरीची आवक वाढायला सरुवात होते.
५३,५६५ शेतकऱ्यांची नोंदणी
राज्यात नाफेडने ७६१ आणि एनसीसीएफने २१८ अशा एकूण ९७९ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. यातील ८८१ केंद्र सुरू करण्यात आले असून, यात नाफेडच्या ६८६ व एनसीसीएफच्या १९५ केंद्रांचा समावेश आहे. या दोन्ही संस्थांकडे ९ मार्चपर्यंत राज्यातील ५३,५६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नाफेडकडे ४८,३७२ तर एनसीसीएफकडे ५,१९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
१२,४०४.९८८६ टन खरेदी
१ फेब्रुवारी ते ९ मार्च या काळात नाफेडने ५,९८१ शेतकऱ्यांकडून १०,८९४.४००७टन तर एनसीसीएफने १,२२१ शेतकऱ्यांकडून १,५१०.५८७९ टन तूर खरेदी केली. या दोन्ही संस्थांनी ५३,५६५ पैकी केवळ ७,२०२ शेतकऱ्यांकडून १२,४०४.९८८६ टन तुरीची खरेदी केली.
उद्दिष्टपूर्ती कठीण : ही खरेदी १ मेपर्यंत सुरू राहणार आहे.
दोन्ही संस्थांना उद्दिष्टपूर्तीसाठी उर्वरित ५३ दिवसांमध्ये ४६,३६३ शेतकऱ्यांकडून ३,२४,५९५.०११४ टन तूर खरेदी करायची आहे. खरेदीचा संथ वेग व तांत्रिक अडचणी विचारात घेता तूर खरेदी उद्दिष्टपूर्ती होणे कठीण आहे.