महावितरण अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:22 IST2019-11-13T22:21:01+5:302019-11-13T22:22:07+5:30
महावितरणच्या अधिकाऱ्यास फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वीज ग्राहकाच्याविरोधात तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महावितरण अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या अधिकाऱ्यास फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वीज ग्राहकाच्याविरोधात तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार महावितरणचे कर्मचारी कब्रस्थान रोड,भानखेडा परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आवाहन करीत होते. मकसूद नावाच्या वीज ग्राहकाकडे महावितरणचे कर्मचारी गेले असता त्याने मला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलायचे आहे असे सांगितले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब इतवारी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश तुपकर यांच्या कानावर घातली. तुपकर यांनी वीज ग्राहक मकसूद यांच्याशी फोनवर संपर्क साधून वीज बिलाची थकबाकी असणारी रक्कम भरावी अशी विनंती केली. तुपकर यांची विनंती धुडकावत वीज ग्राहकाने त्याना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश तुपकर यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर वीज ग्राहकाकडे फेब्रुवारी-२०१९ पासून ३४ हजार २०५ रुपयांची थकबाकी होती, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.