मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 23:52 IST2025-08-02T23:51:43+5:302025-08-02T23:52:55+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य जिल्हा दौऱ्याच्या आधी, तीन ते चार संशयितांकडून एक पिस्टल आणि देशी बनावटीचा कट्टा पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (दि. २) रात्री शहरातील मस्जिद चौकात करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी (दि. ३) जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथे संभाव्य दौरा आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दल अलर्ट मोडवर आहे. कारंजासह जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पूर्वसंध्येला वर्धा शहरातील मस्जिद चौक, महादेवपुरा येथे तीन ते चार संशयित संशयास्पद स्थितीत वावरताना आढळले. पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्टल आणि एक देशी बनावटीचा कट्टा पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे. पोलिसांनी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अंगझडतीत आढळले दोन अग्निशस्त्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दौऱ्यामुळे पोलिस प्रशासन सजग आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महादेवपुरा येथील मस्जिद चौकात काही व्यक्तींकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मस्जिद चौकात पाेहोचून तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंग झडतीतून दोन अग्निशस्त्र मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत.
तपासाअंती गुन्हा दाखल करणार
शहरातील कारला चौक परिसरातील हनुमान नगरातील रहिवासी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती जाणून घेतली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात तपास सुरू होता. तपासाअंती गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.