दिल्लीहून येणाऱ्या गाड्यांमध्ये कसून तपासणी; नागपूरसह, बडनेरा, अकोला, वर्धा, सेवाग्राम बल्लारशाह स्थानकाला हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 23:23 IST2025-11-10T23:22:51+5:302025-11-10T23:23:13+5:30
भीषण बॉम्ब स्फोटानंतर दिल्लीहून नागपूरसह विविध भागात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कसून तपासणी केली जात आहे.

दिल्लीहून येणाऱ्या गाड्यांमध्ये कसून तपासणी; नागपूरसह, बडनेरा, अकोला, वर्धा, सेवाग्राम बल्लारशाह स्थानकाला हाय अलर्ट
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीषण बॉम्ब स्फोटानंतर दिल्लीहून नागपूरसह विविध भागात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये स्पेशल पार्ट्यांकडून कसून तपासणी केली जात आहे. त्याच प्रमाणे नागपूरसह विदर्भातील आठ रेल्वे स्थानकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व रेल्वे स्थानकावर बॉम्बशोधक आणि नाशक पथकांकडून कसून तपासणी केली जात आहे.
सोमवारी रात्री दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ धावत्या आय ट्वेंटी कार मध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचे आरोपी शोधण्यासाठी तपास यंत्रणा वेगवेगळे अँगल तपासत आहेत दिल्लीहून नागपूर आणि देशाच्या इतर भागाला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पेशल पार्टीज (तपास पथके) शिरले असून त्यांनी संशयितांची चौकशी चालवली आहे.
या भीषण स्फोटानंतर भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर- विदर्भालाही अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकासह, अजनी आणि इतवारी तसेच वर्धा, सेवाग्राम, बल्लारशाह, बडनेरा आणि अकोला रेल्वे स्थानकाला देण्यात आला आहे. त्यामुळे नमूद सर्व रेल्वे स्थानकावर
रात्रीपासून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. नमूद स्थानकांवर, अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. श्वान तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथकांकडून कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्रतीक्षालयासोबतच पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या गाड्यांचीही तपासणी केली जात आहे.
रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना तातडीने कर्तव्यावर परत येण्याचे आदेश देण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा
रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त मनोज कुमार यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून परतणाऱ्या गाड्यांची खास तपासणी केली जात आहे. मध्य रेल्वेच्या क्षेत्रात येणाऱ्या महत्त्वाच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा लावण्यात आली असून तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीवर सूक्ष्म नजर रोखण्यात आली आहे.
रायपूरपर्यंत आरपीएफ सुरक्षा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे आरपीएफचे आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या माहितीनुसार, नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकापासून तो डोंगरगड, रायपूर पर्यंत येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अनेक रेल्वे गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे.