प्रवाशांच्या गर्दीत 'हातचलाखी' करणाऱ्या 'चोरनी' गजाआड
By नरेश डोंगरे | Updated: July 19, 2025 19:14 IST2025-07-19T19:13:10+5:302025-07-19T19:14:24+5:30
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त : रेल्वेच्या गुन्हे शाखा पोलिसांचे यश

'Thieves' caught 'sneaking' in crowd of passengers
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या गर्दीत शिरून 'हातचलाखी' करत लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना रेल्वे गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
उषा मोरलाल दुमगो (वय ४०, रा. रामेश्वरी टोली रहाटेनगर) आणि सुरेखा धिरज दुमगो (वय ४८, रा.जयवंतनगर, रहाटे टोली नागपूर) अशी चोरट्या महिलांची नावे आहेत. चंद्रपूर येथील अशोकनगरात राहणाऱ्या विभा पंकज हस्तक (वय ४४) गुरुवारी १७ जुलैला नागपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आल्या. ट्रेन नंबर १२५८९ गोरखपूर चेरलापल्ली एक्सप्रेसच्याकोच नंबर एस-१ मध्ये चढत असताना गर्दीला फायदा उठवून चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील एक छोटी पर्स काढून घेतली. या पर्समध्ये एक मंगळसूत्र, एक नेकलेस, कानातील टाप्स, जिवती, अंगठ्या आणि नथनी तसेच सोन्याचा खडा होता. बल्लारशाह येथे पोहचल्यानंतर विभा हस्तक यांना पर्स चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथे तक्रार दाखल केली. प्रकरण रेल्वे स्थानकावरचे असल्याने तो तपास नागपूर रेल्वे पोलिसांकडे आला.
गुन्हे शाखेने लगेच रेल्वे स्थानकावरचे वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या आधारे चोरट्या महिलांचा माग काढत शुक्रवारी दुपारी आधी उषा दुमगोला ताब्यात घेतले. तिने ही चोरी सुरेखा दुमगो हिच्या मदतीने केल्याची कबुली दिल्यानंतर सुरेखालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघींकडून एकूण २ लाख, ३४ हजार, ९२६ रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. तो मुद्देमाल आणि आरोपी महिलांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
२४ तासात गुन्ह्याचा उलगडा
गुन्हा घडल्याच्या २४ तासात पोलिसांनी ही कारवाई करून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज जप्त करण्यात यश मिळवले. रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे,अप्पर अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, डीवायएसपी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रभारी पंजाबराव डोळे तसेच कर्मचारी महेंद्र मानकर, चंद्रशेखर येळेकर, अश्विन गजबे, चंद्रशेखर मदनकर, पंकज बांते, सचिन गणवीर, विशाल शेंडे, वर्षा कढे, ज्योती पांडे आणि वैशाली शेंडे यांनी ही कामगिरी बजावली.