दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 17:59 IST2022-07-13T17:50:06+5:302022-07-13T17:59:33+5:30
२४ तासांत नागपूर शहरात दोन घरफोड्यांची नोंद

दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार
नागपूर : २४ तासांत शहरात दोन घरफोड्यांची नोंद करण्यात आली आहे. धंतोली व सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घरफोडी झाल्या. एका घटनेत तर जास्त दागिने व रोख न आढळल्याने चोर चक्क घरगुती सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार झाले आहेत.
धोटे ले-आउट येथील श्रीकृष्ण रामभाऊ धुर्वे (४३) हे शेतीच्या कामासाठी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. २९ जून ते १७ जुलै या दरम्यान अज्ञात चोराने प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील रोख १४ हजार व दागिने असा एकूण १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. धुर्वे घरी परत आल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
दुसऱ्या गुन्ह्याची सक्करदरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मोठा ताजबाग येथील निवासी अब्दुल सलिम उर्फ अब्दुल मजीद (३४) ११ जुलै रोजी आपल्या कुटुंबीयांसह गोंदिया येथे गेले होते. त्यांची पत्नी ब्युटीपार्लरचे काम करते. १२ जुलै रोजी परत आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता, सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरांनी घरगुती सिलिंडर, ब्युटीपार्लरचे सामान व रोख १५ हजार असा एकूण साडेबावीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.