‘ऑनलाईन’साठी शिक्षण मंत्रालयात राहणार विशेष विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:00 AM2020-08-03T07:00:00+5:302020-08-03T07:00:36+5:30

शिक्षण मंत्रालयात ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष समर्पित विभागच राहणार आहे. या माध्यमातून ‘डिजिटल’ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती तसेच विविध बदलानुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात पावले उचलण्यात येतील.

There will be a special department in the Ministry of Education for 'Online' | ‘ऑनलाईन’साठी शिक्षण मंत्रालयात राहणार विशेष विभाग

‘ऑनलाईन’साठी शिक्षण मंत्रालयात राहणार विशेष विभाग

googlenewsNext
ठळक मुद्देदेशातील ‘डिजिटल डिव्हाईड’ दूर करण्यावर भर‘व्हर्च्युअल लॅब’ विकसित करणार

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘ऑनलाईन’ शिक्षणावर भर दिला जात असून या प्रणालीचे भविष्यातील महत्त्व सर्वांनाच लक्षात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणातदेखील ‘डिजिटल’ माध्यमावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयात ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष समर्पित विभागच राहणार आहे. या माध्यमातून ‘डिजिटल’ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती तसेच विविध बदलानुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात पावले उचलण्यात येतील.

तंत्रज्ञान सातत्याने बदलताना दिसून येत असून दर सहा महिन्यात नवीन उपकरणे व तंत्र समोर येत आहे. अशा स्थितीत या विशेष विभागामार्फत त्यानुसार ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणालीतदेखील आवश्यक बदल करण्यात येईल. शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील विद्यार्थी व शिक्षकांची गरज लक्षात घेऊन ‘डिजिटल कंटेंट’ विकसित करण्यात येईल. या विभागात केवळ शिक्षणतज्ज्ञच नाही तर प्रशासकीय, तंत्रज्ञान, ‘ई-गव्हर्नन्स’ इत्यादी क्षेत्रातील लोकांचादेखील समावेश राहणार आहे. शिवाय देशपातळीवर ‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येईल.

जनसंवाद माध्यमातून २४ बाय ७ धडे
देशात लोकसंख्येचा मोठा टक्का आजदेखील ‘ऑनलाईन’ माध्यमांपासून दूर आहे. हे अंतर दूर करण्यासाठी व सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी या धोरणानुसार विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. याअंतर्गत दूरचित्रवाणी, रेडिओ, ‘कम्युनिटी रेडिओ’ या जनसंवाद माध्यमातून वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना धडे देण्यात येतील. देशातील विविध भाषांमध्ये २४ बाय ७ हे शिक्षण पुरविण्याची सोय करण्यात येणार आहे.

‘अ‍ॅप’, ‘गेम्स’देखील विकसित करणार
हसतखेळत व प्रात्यक्षिक आधारित ‘ऑनलाईन’ शिक्षण व्हावे यासाठी देशपातळीवर ‘डिजिटल’ संग्रह तयार करण्यात येणार आहे. यात ‘कोर्सवर्क’ची निर्मिती, ‘लर्निंग गेम्स’, ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ इत्यादींचा समावेश असेल. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध विषय तसेच भारतीय कला-संस्कृती सहजतेने कळावी यासाठी ‘गेम’आधारित ‘अ‍ॅप’देखील विकसित करण्यात येतील.

यावर राहणार मंत्रालयाचा भर
-‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘पायलट स्टडी’ राबविणार
-देशाची लोकसंख्या लक्षात घेता ‘डिजिटल’ पायाभूत सुविधांच्या विकासावर भर
-‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी नवीन ‘प्लॅटफॉर्म’ विकसित करणार
-‘दीक्षा’, ‘स्वयम्’ इत्यादींच्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करणार
-शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी सुविधा
-‘ऑनलाईन’ परीक्षा व मूल्यमापनाचा आराखडा ठरविणार
-पारंपरिक व ‘डिजिटल’ शिक्षणप्रणालीची सांगड घालणारे ‘मॉडेल’ तयार करणार
-‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी मापदंड निश्चित करणार.

 

Web Title: There will be a special department in the Ministry of Education for 'Online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.