महाराष्ट्रात चार प्रांतांऐवजी संघाचे होणार सात विभाग; विदर्भात वर्षभरात वाढल्या २१ टक्के शाखा

By योगेश पांडे | Updated: March 24, 2026 20:26 IST2026-03-24T20:23:31+5:302026-03-24T20:26:08+5:30

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत बदलांना मान्यता मिळाली असून आता प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक राहणार आहेत.

There will be seven RSS divisions in Maharashtra instead of four provinces; 21 percent increase in branches in Vidarbha in a year | महाराष्ट्रात चार प्रांतांऐवजी संघाचे होणार सात विभाग; विदर्भात वर्षभरात वाढल्या २१ टक्के शाखा

There will be seven RSS divisions in Maharashtra instead of four provinces; 21 percent increase in branches in Vidarbha in a year

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत बदलांना मान्यता मिळाली असून आता प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक राहणार आहेत. यानुसार महाराष्ट्रात आता चार प्रातांऐवजी सात विभागांत कामाचे विभाजन होणार आहे. पुढील वर्षभरात नेमकी रचना निश्चित करून ती बदलविण्यात येणार आहे. सोबतच पुढील वर्षभर देशभरात संघशाखांच्या वाढीवरदेखील भर देण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.

समालखा येथे झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेबाबत त्यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. यावेळी संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे, महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे, महानगर प्रचारप्रमुख ब्रजेश मानस उपस्थित होते. सद्यस्थितीत पश्चिम क्षेत्रात महाराष्ट्र-गुजरात-गोवा या राज्यांचा समावेश होतो व त्यात एकूण सहा प्रांत आहेत. मात्र नवीन रचनेनुसार गुजरातमध्ये तीन विभाग असतील तर महाराष्ट्रात एकूण सात विभाग असतील. मुंबई अगोदर कोकण प्रांताचा भाग होता. मात्र आता मुंबई वेगळा विभाग असेल. सोबतच कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी, पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भ असे महाराष्ट्रात एकूण सात विभाग असतील, असे तामशेट्टीवार यांनी स्पष्ट केले. देशभरात सद्यस्थितीत ४६ प्रांत आहेत. नवीन रचनेनंतर एकूण विभागांची संख्या ८६ इतकी होईल, असे त्यांनी सांगितले.

विदर्भातील शाखांची संख्या अडीच हजारांवर

विदर्बात २०२५ साली १ हजार १७७ स्थानांवर संघाच्या २ हजार ५८ शाखा होत्या. वर्षभरात त्यात २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली व आता २ हजार ५०२ शाखा लागत आहेत. याशिवाय साप्ताहिक मिलनाची संख्या ३४१ वरून ३७२ इतकी झाली आहे.

विदर्भात २९ लाख घरांशी संपर्क

संघाकडून शताब्दी वर्षांत व्यापक गृहसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे.आतापर्यंत साडेबारा हजार गावांतील २९.७४ लाख घरांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला आहे. तसेच विदर्भात ८२६ ठिकाणी हिंदू संमेलने झाली आहेत, अशी माहिती तामशेट्टीवार यांनी दिली.

तरुणांशी संपर्क वाढविणार

शताब्दी वर्षात संघाकडून सात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची निश्चिती करण्यात आली होती. याअंतर्गतच तरुणांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सोबतच सोशल माध्यमांमध्ये सक्रियतादेखील वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तामशेट्टीवार यांनी सांगितले.

Web Title : महाराष्ट्र में आरएसएस के चार प्रांतों की जगह सात विभाग; विदर्भ में वृद्धि।

Web Summary : आरएसएस महाराष्ट्र को चार प्रांतों के बजाय सात विभागों में पुनर्गठित करेगा। विदर्भ में इस साल आरएसएस शाखाओं में 21% की वृद्धि हुई। संगठन विस्तार और युवा जुड़ाव पर ध्यान केंद्रित कर रहा है, लाखों घरों तक पहुंच रहा है।

Web Title : RSS to Reorganize Maharashtra into Seven Divisions; Vidarbha Sees Growth.

Web Summary : RSS will reorganize Maharashtra into seven divisions instead of four. Vidarbha witnessed a 21% increase in RSS branches this year. The organization is focusing on expansion and youth engagement, reaching millions of homes.