एकनाथ शिंदेंशी कुठलाही दुरावा नाही, माध्यमे तोंडावर पडतील: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By आनंद डेकाटे | Updated: November 23, 2025 18:37 IST2025-11-23T18:37:52+5:302025-11-23T18:37:52+5:30
एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र काही दिवसांपासून राज्यात निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदेंशी कुठलाही दुरावा नाही, माध्यमे तोंडावर पडतील: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे व माझ्यात कुठलाही दुरावा निर्माण झाला नाही, तो माध्यमांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ते तोंडावर पडल्या शिवाय राहणार नाही, असे राज्याचे मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र काही दिवसांपासून राज्यात निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपूरमध्ये आले असता त्यांना माध्यमांनी तुमच्यात आणि शिंदेत दुरावा आहे का , असा प्रश्न केला असता ते म्हणाले, आमच्या दोघात कुठलाही दुरावा नाही, आम्ही आज आणि काल व त्यापूर्वीही परस्परांशी बोललो, एकत्र कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते कुठे जाणार याची मला माहिती आणि मी कुठे जाणार हे त्यांना मी सांगितले आहे. कुठलाही दुरावा नाही, फक्त माध्यमांनी तसे चित्र निर्माण केले आहे. काही फुटेज दाखवून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण ते तोंडावर पडल्या शिवाय राहणार नाही.
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आम्हाला मते दिली नाही तर निधी दिला जाणार नाही, अशी धमकीच मतदारांना दिली, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, असे काहीच नाही, आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचाच विकास करणार आहोत, राजकारणात व जाहीर सभेत असे बोलावेच लागते, पण त्याचा अर्थ तसा नाही, असे फडणवीस म्हणाले.