समसमान जागावाटप होऊ शकत नाही - अशोक चव्हाण
By कमलेश वानखेडे | Updated: January 19, 2024 19:33 IST2024-01-19T19:32:35+5:302024-01-19T19:33:00+5:30
गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले.

समसमान जागावाटप होऊ शकत नाही - अशोक चव्हाण
नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी जो पक्ष जेथे मजबूत आहे त्याला तेथे संधी मिळावी. राष्ट्रवादी व शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फुटीनंतर स्थिती बदलली आहे. दुसरीकडे काँग्रेसपक्ष फुटलेला नाही. त्यामुळे समसमान जागावाटप होऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत ५० टक्क्यांहून अधिक जागांसाठी चर्चा झाली आहे. येत्या आठवड्याभरात तीनही पक्षांची बैठक होईल व उर्वरित जागा देखील निश्चित केल्या जातील. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खोलवर रुजली आहेत. जनतेच्या मनातील योग्य उमेदवारांची निवड केली तर निकाल मिळू शकतो. त्यामुळे जनमत विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेल
लोकांना केंद्र व राज्यात बदल हवा आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन व कॅम्पेन करणे आवश्यक आहे. निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेल. तरच निकाल मिळेल, असेही सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले.