चक्क पोलिसांनाच बॉम्बने उडवून देण्याची धमकी अन ‘खाकी वर्दी’ची भागमभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 08:00 IST2023-04-07T08:00:00+5:302023-04-07T08:00:12+5:30

Nagpur News दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने थेट यशोधरानगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनाच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. ‘डायल ११२’वर आलेल्या या फोनमुळे एरवी सामान्यांबाबत फारसे गंभीर नसणारे पोलिस अधिकारी लगेच ‘ॲक्शन मोड’मध्ये आले व ‘खाकी वर्दी’ची भागमभाग झाली.

The threat of blowing up the police itself with a bomb is part of the 'khaki uniform' | चक्क पोलिसांनाच बॉम्बने उडवून देण्याची धमकी अन ‘खाकी वर्दी’ची भागमभाग

चक्क पोलिसांनाच बॉम्बने उडवून देण्याची धमकी अन ‘खाकी वर्दी’ची भागमभाग

योगेश पांडे

नागपूर : मागील काही कालावधीत बॉम्ब ठेवल्याच्या किंवा बॉम्बने व्हीआयपींना उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्याच्या घटना घडल्या. मात्र दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने थेट यशोधरानगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनाच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. ‘डायल ११२’वर आलेल्या या फोनमुळे एरवी सामान्यांबाबत फारसे गंभीर नसणारे पोलिस अधिकारी लगेच ‘ॲक्शन मोड’मध्ये आले व ‘खाकी वर्दी’ची भागमभाग झाली. अखेर संबंधित फोन पोकळ धमकीचाच असल्याचे स्पष्ट झाले व यशोधरानगर पोलिस ठाण्यातील उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.

सकाळच्या सुमारास पेट्रोलिंग सुरू असताना ‘डायल ११२’च्या माध्यमातून यशोधरानगर बिट मार्शलला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने ‘मुलींचे मृतदेह अद्यापही प्राप्त झालेले नाहीत व माझ्या तक्रारीच्या प्रकरणात कारवाईदेखील झाली नाही. त्यामुळे पोलिसांनाच बॉम्बने उडविण्यात येईल’, अशी धमकी दिली. हे ऐकून संबंधित बिट मार्शलने लगेच वरिष्ठांना ही माहिती दिली. संबंधित मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क केला असता तो ‘स्वीच ऑफ’ दाखवत होता. या प्रकाराची माहिती इतर वरिष्ठांना देण्यात आली व अगदी पोलिस ठाण्यात कुठली अनोळखी वस्तू आहे का याचीदेखील तपासणी झाली. काही वेळाने संबंधित फोन लागला असता संबंधित व्यक्तीने पोलिसांना त्रास देण्यासाठीच हा फोन केल्याचे सांगितले व त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास घेतला. मात्र संबंधित प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतला व संबंधित कॉलरविरोधात तक्रार नोंदविण्या आली. यशोधरानगर पोलिस ठाण्यातच त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकारचे फोन येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी निश्चितच वाढली आहे.

फोन कॉलर अद्यापही ‘आऊट ऑफ रिच’

संबंधित फोन क्रमांकाची माहिती काढली असता तो सावनेर तालुक्यातील वलनी येथील एका संगणक रिपेअरिंग सेंटरचा पत्ता दाखवत होता. पोलिसांनी शहानिशा केली असता तो क्रमांक अनेक दिवसांअगोदरच पोर्ट झाला आहे. संबंधित कॉलरशी बोलणे झाल्यावरदेखील त्याने पोलिस ठाण्यात येण्याचे टाळले. तसेच त्यानंतर तो पोलिसांचे फोनदेखील उचलत नाही.

कॉलर ‘सायको’ की पोलिसांबाबत राग ?

संबंधित कॉलरने याअगोदरदेखील यशोधरानगर पोलिस ठाण्यात अनेकदा फोन करून धमक्या दिल्या आहेत. मात्र यावेळी त्याने थेट पोलिसांनाच बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याने हे प्रकरण गंभीरतेने घेण्यात आले. शिवाय पहिल्यांदाच त्याने ‘डायल ११२’च्या माध्यमातून धमकी दिली आहे. संबंधित व्यक्ती दरवेळी फोनवर संताप दर्शवितो. त्यामुळे या ठाण्यातील पोलिसांबाबत त्याच्या मनात राग आहे की तो ‘सायको’ आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: The threat of blowing up the police itself with a bomb is part of the 'khaki uniform'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.