कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2025 00:09 IST2025-05-21T00:08:18+5:302025-05-21T00:09:43+5:30
आई अन् मुलांची ताटातूट; कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये घटना: चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला

कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
- नरेश डोंगरे, नागपूर
चिमुकल्यांना घेऊन निघालेली महिला एका रेल्वे स्थानकावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरते. ती पाणी भरत असतानाच ट्रेन सुटते. मुले ट्रेनमध्ये तर आई फलाटावर आक्रोश करतात. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा हा प्रसंग माँ (१९९९), रामपूर का लक्ष्मण (१९७२) आणि अशाच अनेक हिंदी चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला अन् ती मुले, बिचारी आई तसेच रेल्वे स्थानकांवरील शेकडो प्रवाशांच्या मनात बराच वेळपर्यंत भावनांची धडधड होत राहिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोमवारी सकाळी ९.२० च्या सुमारास मुंबईकडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेस गोंदिया स्थानकावर थांबली. अन्य प्रवाशासोबत आई निरुपमा (नाव काल्पनिक) फलाटावरच्या नळावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरली.
गर्दीमुळे तिला पाणी भरण्यास विलंब झाला अन् गाडीने रेल्वे स्टेशन सोडले. या गाडीत महिलेची राम आणि शाम (नावे काल्पनिक) ही दोन लहानगी होती. त्यामुळे तिच्या काळजात धस्स झाले.
मुलांपासून ताटातुट झाल्याने तिने एकच आक्रोश केला. तो बघता प्रवाशांनी गोंदिया स्थानकावरच्या रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) कळविले. प्रसंगावधान राखत त्यांनी रेल्वे कंट्रोलला कॉल दिला.
नागपूरकडे येणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये दोन लहानगी असून, त्यांची तसेच त्यांच्या आईची ताटातुट झाल्याचेही कळविण्यात आले. ट्रेन मॅनेजर, टीसीसह रनिंग स्टाफने त्याची गंभीर दखल घेत लगेच त्या दोन लहानग्यांना शोधून पॅन्ट्री कारमध्ये बसविले.
ईकडे गाडी नागपूर स्थानकावर पोहचताच आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल भानसे आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र सिंग यांनी राम आणि शामला ताब्यात घेतले. चाईल्ड लाईन प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांची वास्तपूस्त केली. त्यांना धीर देत खाऊही दिला.
ती पोहचली, अन् ...
कर्मभूमीच्या मागून नागपूरकडे येणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये त्या मातेला गोंदियाच्या रेल्वे स्टाफने बसवून दिले. निरुपमा नागपुरात पोहचली. फलाटावर उतरताच आरपीएफने तिला मुले असलेल्या ठिकाणी नेले. आईला दुरून बघताच राम आणि शाम धावतच येऊन आईला बिलगले. बिछडलेल्या मायलेकांचे मिलन अनेकांच्या नेत्रकडा ओल्या करणारे ठरले.