राज्याची आर्थिक स्थिती बिकट, पण हिवाळी अधिवेशनाच्या नावावर होतील कोट्यवधी रुपये खर्च
By आनंद डेकाटे | Updated: October 11, 2025 19:45 IST2025-10-11T19:44:38+5:302025-10-11T19:45:11+5:30
यंदा राजभवनावर खर्च होणार दहा कोटी रुपये : हिवाळी अधिवेशनासाठी १८७ कोटींचा निधी मंजूर

The state's financial situation is dire, but crores of rupees will be spent in the name of the winter session
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील आर्थिक परिस्थिती योग्य नाही. एक योजना राबविण्यासाठी दुसऱ्या विभागाचा निधी वळविण्याची वेळ आली आहे. राज्यात अतिवृष्टी आहे. शेतकरी हवालदिल आहेत. तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहे. एकट्या राजभवनावरच १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राजभवनच्या मागणीनुसार हा निधी देण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग-१ चे कार्यकारी अभियंते लक्ष्मीकांत राऊळकर यांनी सांगितले. यंदा हिवाळी अधिवेशनासाठी १८७ कोटींचा निधी मंजूर असून यातील १०० कोटी खर्चाचे प्रस्ताव याच वर्षीचे असून ८७ कोटी असल्याचेही त्यांनी सांगितले.
८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. विधान भवन, रविभवन, नागभवन, देवगिरी, विजयगड, रामगिरी, राजभवन, १६० गाळ्यांमध्ये देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून कार्यदेशही देणेही सुरू झाले आहे. कार्यकारी अभियंते लक्ष्मीकांत राऊळकर यांनी सांगितले की, यंदा हिवाळी अधिवेशनासाठी १८७ कोटींचा निधी मंजूर झाला. यातील ८७कोटींचा निधी हा थकीत बिलांसाठी आहे. तर १०० कोटींचा निधी अधिवेशनावर खर्च होईल. एकट्या राजभवनवर १० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तशी मागणी त्यांच्याकडून असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी राजभवनाच्या दुरुस्तीवर निधी खर्च झाल्याचे सांगण्यात येते.
तो दावा ठरला फोल
हिवाळी अधिवेशनावर मागील वर्षी २० कोटींच्या घरात खर्चाचे आराखडे सादर झाले होते. यंदा कमी खर्च होईल, असा दावा केला जात होता. परंतु तो फोल ठरला.