२० ते ४० वयोगटात झपाट्याने वाढतोय 'टाइप- २ मधुमेहा'चा धोका; दहा वर्षात झाली आश्चर्यकारक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:46 IST2025-11-14T14:45:51+5:302025-11-14T14:46:28+5:30
Nagpur : भारतात आता मधुमेह फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिला नाही. तरुण पिढीमध्येही 'टाइप २ मधुमेह' वेगाने वाढत आहे. २० ते ४० वर्षांच्या वयोगटातील रुग्णसंख्या गेल्या दशकात तब्बल ७३ टक्क्यांनी वाढल्याचे अलीकडील आकडे-वारीत दिसून आले आहे.

The risk of 'Type 2 diabetes' is increasing rapidly in the age group of 20 to 40; There has been a surprising increase in ten years
नागपूर : भारतात आता मधुमेह फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिला नाही. तरुण पिढीमध्येही 'टाइप २ मधुमेह' वेगाने वाढत आहे. २० ते ४० वर्षांच्या वयोगटातील रुग्णसंख्या गेल्या दशकात तब्बल ७३ टक्क्यांनी वाढल्याचे अलीकडील आकडे-वारीत दिसून आले आहे. हा आजार वृद्धांमध्ये होणाऱ्या मधु-मेहापेक्षा अधिक आक्रमक असून, तरुणांमध्ये तो लवकर गुंतागुंत निर्माण करतो, असा इशारा वरिष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिला आहे.
तरुणांमध्ये वेगाने वाढते प्रमाण
दक्षिण भारतातील २० ते ३९ वयोगटातील मधुमेहाचे प्रमाण २००६ ते २०१६ दरम्यान ४.५ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांपर्यंत वाढले म्हणजेच तब्बल ७३ टक्क्यांची वाढ. भारतातील मधुमेहाचे सरासरी निदान वय पाश्चात्य देशांपेक्षा दहा वर्षांनी कमी असल्याने, आजच्या तरुणांनी आतापासूनच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले. ते जागतिक मधुमेह दिनानिमित्त पत्रकारांशी बोलत होते. भारतात सध्या १०.१ कोटी मधुमेही आहेत. २०४५ पर्यंत हा आकडा १२.५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, १५ ते ४९ वयोगटातील प्रत्येक चार मधुमेहींपैकी एकजण आपल्याला मधुमेह आहे हेच जाणत नाही, त्यामुळे गुंतागुंत वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण दिसून येते.
लवकर गुंतागुंत आणि कमी आयुष्यमान
तरुण वयात मधुमेहाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचे, मूत्रपिंडांचे, मज्जातंतूंचे, तसेच हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या गुंतागुंती लवकर व अधिक गंभीर स्वरूपात होतात. तरुण रुग्णांमध्ये इन्सुलिन बनवणाऱ्या बीटा पेशींची कार्यक्षमता जलदगतीने कमी होते, ज्यामुळे आयुष्यमान सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते.
आनुवंशिक आणि जीवनशैलीचा दुहेरी परिणाम
'अर्ली-ऑन्सेट टाइप २ डायबिटीज मेलिटस' (ईओटीरडीएम) हा आजार आनुवंशिक व पर्यावरणीय घटकांच्या एकत्रित परिणामामुळे होतो. मुख्य जोखीम घटकांमध्ये तरुणांमधील पोटाभोवती चरबीची वाढ, आईकडून मधुमेहाचा इतिहास, रक्तसंबंधीय विवाह, बसून राहण्याची जीवनशैली, जास्त साखर आणि कॅलरीयुक्त आहार हे प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.