महसूल मंत्रालयाकडून पोरांना थंड पेय देण्याचे आदेश पण पैसा कोण देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:40 IST2025-04-03T18:39:15+5:302025-04-03T18:40:31+5:30
Nagpur : महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सर्व शाळांना सूचना

The Revenue Ministry has ordered to provide cold drinks to children, but who will pay for it?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळा वाढल्याने हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार वेळेचे नियोजन करा, वर्गखोल्या थंड ठेवा, प्रथमोपचार आणि पेयजलाची सोय करा, पोषण आहारात मुलांना सरबत, ताक, ओआरएसचे पाकीट द्या, आदी सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व शाळांना केल्या आहेत. मात्र यासाठी पैसा कोठून आणायचा, हा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर आहे. पोषण आहाराचे किंवा शाळांना साहित्यखरेदीसाठी मिळणारे अनुदान वेळेत मिळत नसताना आता या गोष्टींच्या खरेदीसाठी पैसा कोठून आणायचा, असा सवाल विचारला जात आहे.
आहारासाठीचे अनुदान वेळेवर मिळत नाही?
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत मिळणाऱ्या पोषण आहाराचे अनुदान वेळेवर मिळत नाही. या वर्षीचे अनुदान अद्याप शाळांकडे आले नाही. बऱ्याच शाळांमध्ये तांदूळ नव्हते, जे दोन दिवसांपूर्वी देण्यात आले. अनुदान वेळेत मिळत नसल्याने हा खर्च शिक्षक, मुख्याध्यापकांना करावा लागतो. त्यामुळे नव्या आदेशानुसार गोष्टींसाठी पैसा आणायचा कोठून, हा प्रश्न आहे.
ही अडचण कोण समजून घेणार?
उन्हाचा तडाखा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात परीक्षा आटोपणे चांगले होते. मात्र शासनाने पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. यानंतर पाच दिवसांत पेपर तपासून १ मे रोजी निकालही द्यायचा आहे. हे कसे साध्य होणार आहे, याचा विचार सरकारने केला नाही. आता हा आदेश थोपवून सरकारने शाळांना खर्चात पाडले आहे.
पैसे आणायचे कोठून?
- शासनाने दिलेले आदेश योग्य असले तरी या सर्व गोष्टी पुरविण्यासाठी पैसा कोठून आणायचा, हा प्रश्न आहे. साहित्य खरेदीसाठी लहान शाळांना ५००० व मोठ्या शाळांना १२,५०० रुपये शाळा संयुक्त अनुदान मिळते, जे यावर्षी मिळाले नाही. एखाद्या शाळेत २५ ते ३० मुले असतील, त्यांना जमेल; पण शंभर, दोनशे, अडीचशे विद्यार्थी असलेल्या शाळांना एवढा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे.
- पोषण आहारात ताक, सरबत : पोषण आहारात ताक, सरबत यांसह संत्री, टरबूज, खरबूज, द्राक्षे, अननस, काकडी, कोथिंबीर, स्थानिक फळे, भाज्या व उच्च प्रमाणात पाणी असलेली फळे द्यावीत.
- दुपारच्या सत्रात खेळ नको : सकाळच्या वेळी कवायती, खेळ आटोपावेत. दुपारी मैदानी खेळ व इतर हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत. मुलांना उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी शिक्षित करावे.
काय आहेत आदेश?
शाळेच्या वेळेचे नियोजन करा: वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता शाळेची वेळ व वेळापत्रकात सुसूत्रता आणण्यासाठी सकाळच्या सत्रात शाळा भरवाव्या. प्राथमिकची वेळ सकाळी ७ ते ११:१५ आणि माध्यमिकच्या वेळी सकाळी ७ ते ११:४५ पर्यंत करावी.
"अनेक शाळांमध्ये वीज बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. अशा वेळी पंखे, कुलर चालवायचे कसे? बऱ्याच शाळांमध्ये पंखेसुद्धा नाहीत. रोजचे इंधन, भाजीपाला अनुदान चार-चार महिने येत नाही. या वर्षीचे शाळा संयुक्त अनुदान अजूनही मिळालेले नाही. वर्षभर शिक्षकांनाच खर्च करावा लागतो. वरून उन्हाळ्याचा खर्च. हा सर्व खर्च करायचा कोठून?"
- परशराम गोंडाणे, मुख्याध्यापक व मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना.