नगराध्यक्षपदाच्या दावेदाराचे नाव मतदार यादीतून गायब ! दुसऱ्याच शहराच्या यादीत आढळले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:24 IST2025-10-20T16:22:15+5:302025-10-20T16:24:00+5:30

कोंढाळी येथील प्रकार : वानाडोंगरीच्या मतदार यादीत आढळले नाव

The name of the candidate for the post of mayor is missing from the voter list! The name was found in the list of another city. | नगराध्यक्षपदाच्या दावेदाराचे नाव मतदार यादीतून गायब ! दुसऱ्याच शहराच्या यादीत आढळले नाव

The name of the candidate for the post of mayor is missing from the voter list! The name was found in the list of another city.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी :
नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच नगराध्यक्ष व प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यासोबतच निवडणूक विभागाने मतदार यादी प्रकाशित केले. कोंढाळी शहराच्या मतदार यादीतून नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या व्यक्तीचे नाव वगळण्यात आले असून, त्यांचे नाव हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी शहरातील मतदार यादीत समाविष्ट केल्याचा घोळ उघड झाला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोंढाळी शहरात मतदान केले होते.

कोंढाळी (ता. काटोल) नगरपंचायतची ही पहिलीच निवडणूक आहे. संजय नत्थुजी राऊत, रा. कोंढाळी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी अशी ओळख असून, सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये सक्रीय आहे. त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने तसेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी जाहीर करण्यात आल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्याअनुषंगाने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. 

दरम्यान, नगरपंचायत कार्यालयात ८ ऑक्टोबरला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. संजय राऊत यांनी मतदार यादी चाळून बघितली असता, त्यांना त्यांचे नाव यादीतून वगळले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशीअंती त्यांचे नाव कोंढाळी नगरपंचायतमधून वगळून वानाडोंगरी नगरपालिकेच्या यादीत ऑनलाइन पद्धतीने समाविष्ट केल्याचे उघड झाले. संजय राऊत यांनी सन २००३ पासून तर २०२३ पर्यंत सलग २० वर्षे कोंढाळी ग्रामपंचायतचे सदस्यपद भूषविले आहे. सन २०२४ मध्ये या ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव त्यांच्याच कार्यकाळात मंजूर करण्यात आला. जनमानसांत त्यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने सामान्य मतदारांनी नवल व्यक्त केले आहे. आचारसंहिता लागू करण्यापूर्वी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून या प्रकाराचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढणे गरजेचे आहे. 

शहानिशा, सुनावणी न करता मंजुरी

७ डिसेंबर २०२४ रोजी हिंगणा तहसील कार्यालयाला ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे संजय राऊत यांचे नाव कोंढाळी येथील मतदार यादीतून वगळून वानाडोंगरी येथील यादीत समाविष्ट केल्याची माहिती हिंगणा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना दिली. निवडणूक विभागाने या अर्जाची कुठलीही शहानिशा केली नाही किंवा त्यावर आक्षेप व सुनावणी न घेता १२ डिसेंबर २०२४ रोजी या अर्जाला मंजुरी दिली. पुढे २ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे नाव कोंढाळी येथून कमी करून वानाडोंगरी येथे समाविष्ट केले. नाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्ज क्रमांक - ९ सोबत संजय राऊत यांचे आधारकार्ड अथवा कुठलीही कागदपत्रे जोडलेली नाहीत. त्या अर्जावर बीएलओची स्वाक्षरी देखील नाही. हिंगणा तहसील कार्यालयाने शहानिशा न करता अर्ज क्रमांक ७ काटोल तहसील कार्यालयाला पाठविला व त्यांचे नाव वगळले.

"माझे नाव राजकारण व हेतुपुरस्सर मतदारयादीतून वगळण्यात आले आहे. नाव वगळण्यासाठी मी निवडणूक विभागाकडे ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज केला नव्हता. या संदर्भातील कोणत्याही अर्जावर मी स्वाक्षरी देखील केली नाही. यासंदर्भात मी काटोल तहसील कार्यालयात चौकशी केली. माझे नाव ऑनलाइन अर्ज करून वानाडोंगरी येथे स्थानांतरीत केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा अर्ज कुणी केला, हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहे."
- संजय राऊत, कोंढाळी, ता. काटोल

Web Title : महापौर पद के दावेदार का नाम मतदाता सूची से गायब, अन्यत्र मिला।

Web Summary : कोंढाली में महापौर पद के प्रबल दावेदार संजय राऊत का नाम मतदाता सूची से गायब पाया गया। रहस्यमय ढंग से यह वानाडोंगरी में मिला। राऊत ने मतदाता सूची में त्रुटि के पीछे राजनीतिक साजिश का आरोप लगाया और उच्च न्यायालय में अपील करने की योजना बनाई है।

Web Title : Mayoral hopeful's name vanishes from voter list, found elsewhere.

Web Summary : Sanjay Raut, a strong Nagaradhyaksha contender in Kondhali, discovered his name missing from the local voter list. It mysteriously appeared in Wanadongri. Raut alleges political conspiracy behind the voter list error and plans to appeal to the High Court.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.